आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑकलंड- सलामीच्या गत सामन्यातील विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय संघ आता यजमान न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. यासह भारताला या दौऱ्यामध्ये ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद करता येईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी टी-२० मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक तिसरा सामना होणार आहे. प्रत्येकी एका विजयासह दोन्ही संघांनी या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता निर्णायक सामन्यात बाजी मारून मालिका खिशात घालण्यावर दोन्ही संघांची नजर आहे. भारताने गत सामन्यात शानदार विजय संपादन केला. या विजयाने भारताचा संघ पुन्हा एकदा लयीत आला. आता हीच लय कायम ठेवत मालिका आपल्या नावे करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा मानस आहे. तत्याची नजर आता आपल्या कुशल नेतृत्वात पहिला मालिका विजय मिळवून देण्याकडे लागली आहे. शुक्रवारी भारताने त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडमध्ये टी-२० च्या फॉरमॅटमध्ये पहिला विजय मिळवला. याच विजयासह आता मालिका जिंकण्याचेही खाते उघडण्यासाठी भारताचा संघ उत्सुक आहे. त्यामुळे आता या निर्णायक सामन्यावर सर्वांची नजर असेल.
मोहीम कायम ठेवणार :
भारतीय संघ गत तीन महिन्यात सलगच्या मालिका विजयाने जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध मालिकामध्ये विजयाची नोंद करता आली. भारताने टी-२० मालिका जिंकण्याचाही पराक्रम गाजवला. त्यामुळे संघ हीच लय कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. या विजयाने भारताला दौरा मालिका जिंकून पूर्ण करता येईल.
धोनीलाही मोठी संधी :
धोनीही आता तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या यादीत पाचवे स्थान गाठण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी त्याला दोन षटकारांची गरज आहे. त्याचे आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटच्या ५२३ सामन्यांत ३४८ षटकार आहेत. त्याने ९० कसोटींत ७८, ३३८ वनडेत २२२ आणि ९५ टी-२० सामन्यांत ४८ षटकार मारले आहेत. यामुळे त्याला दोन षटकारांसह ३५० षटकार पूर्ण करता येईल.
रोहितला आजही संधी हिटमॅन नोंदवणार विक्रम
दुसऱ्या सामन्यात झंझावाती खेळी करून रोहित शर्माने एकाच दिवशी पाच विक्रमांना गवसणी घातली. आता त्याची नजर आता विक्रमाकडे लागली. त्याला तिसऱ्या सामन्यातही याची मोठी संधी आहे. तो आता या सामन्यातील उत्तुंग षटकारांतून स्फोटक फलंदाज क्रिस गेल आणि मार्टिन गुप्तिलला मागे टाकू शकेल. या दोघांच्या नावे सर्वाधिक प्रत्येकी १०३ षटकार नोंद आहे. त्यापाठोपाठ रोहित शर्मा हा ९२ टी-२० सामन्यांत १०० षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता चार षटकारांच्या आधारे तो या दोघांनाही मागे टाकू शकेल. गेलने ५६ आणि गुप्तिलने ७६ सामन्यांतून हा विक्रमी पल्ला गाठला.
आता तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकारावर नजर
आता रोहित शर्मा हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पाचवा फलंदाज होण्यापासून अवघ्या एका पावलावर आहे. त्याच्या नावे कसोटी, वनडे आणि टी-२० च्या फॉरमॅटमध्ये एकूण ३४९ षटकार आहेत. त्याने ३२६ सामन्यांतून हा पल्ला गाठला. यामध्ये रोहितने २७ कसोटींत ३२, २०१ वनडेत २१५ आणि ९२ टी-२० सामन्यांत १०२ षटकार मारले आहेत. असा पल्ला गाठणारा रोहित हा जगातील पाचवा फलंदाज ठरेल.
भारतीय महिलांचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न!
मालिका पराभवातून सावरलेला भारतीय महिला संघ आता दौऱ्यातील आपला शेवट गोड करण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय महिला संघाचा टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी यजमान न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही संघ हॅमिल्टनच्या मैदानावर समोर असतील. यजमान न्यूझीलंड संघाने सलगच्या दोन विजयाच्या बळावर ही तीन टी-२० सामन्यांची मालिका जिंकली. आता या टीमची नजर विजयी हॅट्ट्रिकवर आहे.
हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारताचा महिला संघ या विजयासाठी शर्थीची झुंज देणार आहे. यातून टीमला या दौऱ्याचा शेवट विजयाने करता येईल. भारताने वनडे मालिका सहज जिंकली. मात्र, या टीमला या फॉरमॅटमध्ये विजयाची लय कायम ठेवता आली नाही. त्यामुळे आता या मालिकेत विजयी ट्रॅकवर येण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
जेमीमा, स्मृतीकडून आशा :
वनडे मालिका विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या युवा फलंदाज जेमीमा रॉड्रिग्ज आणि स्मृतीकडून भारतीय महिला संघाला आता मोठ्या खेळीची आशा आहे. यांच्या झंझावाताच्या बळावर संघाला विजयाची नोंद करता येईल. स्मृती सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.