आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशातून स्वयंपाकाचा गॅस आयात करून पूर्वांचलला देणार! भारत-बांगलादेशात ७ करार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी शनिवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली. जलस्रोत क्षेत्रात मदत, तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत सहमती, संस्कृती, शिक्षण, किनारपट्टी सुरक्षा इत्यादी क्षेत्रातील ७ करारांवर उभय नेत्यांनी स्वाक्षरी केली. सध्या असलेल्या करारांना सुरू ठेवण्यावरही उभय देशांत सहमती झाली. 
 
दाेन्ही नेत्यांनी तीन संयुक्त प्रकल्पांचेही उद्घाटन केले. त्यात भारत बांगलादेशमधून स्वयंपाकाचा गॅस आयात करेल. त्याचे वितरण ईशान्येकडील राज्यांत केले जाईल. माेदी व हसीना यांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार, परिवहन इत्यादी मुद्द्यांवरही चर्चा केली. याप्रसंगी माेदी म्हणाले, उभय देशांनी एक वर्षात १२ संयुक्त प्रकल्पांची सुरुवातही केली. या तिन्ही प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद दाेन्ही नेत्यांनी व्यक्त केला. दाेन्ही देशांतील सहकार्य संबंध इतर देशांसाठी निश्चितपणे अनुकरणीय आहेत, असे माेदी यांनी सांगितले. सागरी सुरक्षा, अणुऊर्जा, व्यापाराच्या क्षेत्रातील संबंध बळकट झाले आहेत. गेल्या काही वर्षांत हे हाेऊ शकले. परस्परांतील संबंध बळकट करण्यावर आम्ही भर दिल्याचे हसीना यांनी सांगितले. 

 

जयशंकर - हसीना यांच्यात चर्चा 
माेदींशी चर्चा केल्यानंतर शेख हसीना यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले, उभय नेत्यांत द्विपक्षीय चर्चा झाली. भारत व बांगलादेश यांच्यातील संबंध आतापर्यंत एवढे घनिष्ठ स्वरूपाचे राहिले नाहीत. भारताने व्यापार, संपर्क, विकास, देशांतील जनतेचा परस्पर संपर्क, संस्कृतीला प्राेत्साहन देण्यावर अधिक भर दिला आहे. 
 

एनआरसीसारखे मुद्दे चर्चेत नव्हते 
भारत व बांगलादेश यांच्यात एनआरसी, सीमेवरील काटेरी कुंपण, घुसखाेरीसारख्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित हाेती. भाजपने गेल्या निवडणुकीत एनआरसी व घुसखाेरी मुद्दा बनला हाेता. परंतु त्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले नाही. चीननिर्मित पाणबुडी बांगलादेश खरेदी करणार आहे. त्याचबराेबर बंदर उभारणार असल्याच्या मुद्द्याचाही चर्चेत समावेश हाेता. 
 

निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भेटीवर
नवी दिल्लीत माेदी व शेख हसीना यांनी एकाच वेळी रिमाेटचे बटण दाबून तीन संयुक्त प्रकल्पांचे उद्घाटन केले. उद्घाटनप्रसंगीचे हे छायाचित्र. बांगलादेश व भारतात सार्वत्रिक निवडणुकीनंतर शेख हसीना पहिल्यांदाच भारत भेटीवर आल्या हाेत्या. गुरुवारी व शुक्रवारी वर्ल्ड इकाॅनाॅमिक फाेरममध्ये त्यांनी सहभाग घेतला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...