आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला धडा शिकवण्याची सुवर्णसंधी भारताने गमावली : मेजर जनरल जी. डी. बक्षी यांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पाकिस्तानच्या बालाकोटवरील एअर स्ट्राइकनंतर भारतीय हद्दीत विमाने पाठवून बॉम्ब टाकणाऱ्या पाकिस्तानला मोठा धडा शिकवण्याची सुवर्णसंधी भारताला पूर्ण क्षमतेचे युद्ध लढण्याची तयारी नसल्याने गमावावी लागली, असे धक्कादायक मत मेजर जनरल जी. डी. बक्षी (सेवानिवृत्त) यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. 


चीन आणि पाकिस्तानकडून वाढता धोका लक्षात घेता अत्याधुनिक शस्त्रसामग्रीची खरेदी आणि विकासासाठी मोदी सरकारने वेगाने पावले उचलायला हवीत, असा इशारा जनरल बक्षींनी दिला आहे. ते पुढे म्हणाले, देशाच्या संरक्षण सज्जतेत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील उदासीनता आता देशाच्या मुळावर उठली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर वायुसेनेने पाकिस्तानात घुसून बालाकोटवर हवाई हल्ले केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्ब टाकले. पाकिस्तानच्या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला मान्य होणारे निमित्त करून पाकला मोठा धडा शिकवण्याची भारताला आयती संधी चालून आली होती. आम्ही तो हल्ला परतावून लावला व पाकिस्तानचे एफ-१६ विमानही पाडले. मात्र, पूर्ण क्षमतेचे युद्ध लढण्यासाठी पुरेशा शस्त्रसामग्रीच्या अभावामुळे भारताला ती संधी गमवावी लागली. 


लष्कराकडे सध्या पाणबुड्या, युद्ध विमानांची कमतरता
मोदी सरकारने रफाल िवमाने आणि अन्य काही युद्धसामग्रीसाठी केलेल्या करारांमुळे संरक्षणसिद्धतेच्या दिशेने गती येत असली तरी ती आता अत्यंत अपुरी आहे. वायुसेनेत रफालचे फार तर दोन स्क्वॉड्रन तयार होते. पण त्यापुढे काय? बोफोर्सनंतर सैन्यदलांकडे नव्या तोफाच आल्या नाहीत. आता काही अमेरिकन तोफा येऊ घातल्या असल्या तरी त्यांची संख्या अत्यंत तोकडी आहे. नौदलाकडील पाणबुड्यांची संख्याही अतिशय तोकडी असून ती तातडीने वाढवण्याची गरज आहे.  वायुसेनेकडील युद्ध विमानांच्या स्क्वाड्रनची संख्या झपाट्याने कमी होत असून ती आता ३० वर आली आहे. २०२० पर्यंत ती २६ पर्यंत खाली येणार आहे. पाकिस्तानकडे युद्ध विमानांची २५ स्क्वॉड्रन आहेत, तर चीनच्या वायुशक्तीला आता मर्यादा राहिलेली नाही. या परिस्थितीत दोन्ही देशांकडून आव्हान निर्माण झाल्यास त्याचा सामना कसा करणार हाच खरा आता देशापुढील मोठा प्रश्न आहे.

 

तालिबान्यांचाही भारताला धोका
संरक्षणसिद्धतेत आंतरराष्ट्रीय परिस्थिती देशासाठी प्रतिकूल होत आहे. संरक्षण सामग्रीसाठी अमेरिकेकडे जावे की रशियाकडे, असा पेच देशापुढे आहे. अमेरिकेच्या धोरणांपायी इंधन सुरक्षेेच्या दृष्टीने इराणचा पर्याय राहिला नाही. अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या माघारीनंतर तेथे तालिबान दाखल झाल्यास त्यांचा धोकाही देशाला आहे. सुदैवाने या प्रश्नांची जाण असलेले मोदी सरकार पुन्हा येणार असल्याने तातडीने हे विषय मार्गी लागतील, अशी अपेक्षा मेजर बक्षींनी व्यक्त केली.

 

युद्धसामग्री खरेदी प्रक्रिया जलद गतीने राबवण्याची आता गरज 
चीनचे आव्हान पेलण्यासाठी ईशान्येकडे ‘माउंटेन स्ट्राइक कोर’ उभारण्याच्या दिशेने अद्याप काहीही झाले नाही. विमाने आणि युद्धसामग्रीची खरेदी प्रक्रिया अत्यंत वेगाने राबवण्याची गरज तर आहेच. याशिवाय देशातील खासगी क्षेत्राला आम्ही प्रोत्साहन दिले नाही तर देशाला मोठे नुकसान सहन करावे लागेल, असे जनरल बक्षी म्हणाले.