UNSC / संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानी पत्रकारांनी विचारले कधी सुरू होणार द्विपक्षीय चर्चा; भारतीय राजदूतांनी दिले हे उत्तर

UNSC च्या गुप्त बैठकीनंतर राजदूत अकबरुद्दीन यांचा पत्रकारांशी संवाद

दिव्य मराठी वेब

Aug 17,2019 12:42:00 PM IST

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) शुक्रवारी एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीत काश्मीर आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे भारताने स्पष्ट केले. सोबतच, पाकिस्तानला चर्चा सुरू करायची असल्यास त्यांनी आधी दहशतवादावर लगाम लावावी असेही म्हटले. यानंतर यूएनमध्ये भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये 3 पाकिस्तानी पत्रकार सुद्धा उपस्थित होते.


पत्रकारांना दिले हे उत्तर...
अकबरुद्दीन यांना पाकिस्तानी पत्रकारांनी प्रश्न विचारले. तसे अकबरुद्दीन यांनीच सांगितले होते. यावर एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारले की "भारताची पाकिस्तानसोबत चर्चा (द्विपक्षीय) कधी सुरू होणार आहे?" त्यावर अकबरुद्दीन आपल्या पोडियमवरून खाली उतरले आणि त्या पत्रकारापर्यंत पोहोचले. तसेच पाकिस्तानी पत्रकाराशी हस्तांदोलन करून म्हणाले, "याची (चर्चेची) सुरुवात मी आपल्याकडून करतो." अकबरुद्दीन यांच्या उत्तराचे तेथे उपस्थित पत्रकारांनी स्वागत केले.


आम्ही सिमला करारावर कटीबद्ध
यानंतर अकबरुद्दीन पुन्हा आपल्या पोडियममध्ये परतले आणि म्हणाले, "आम्ही मैत्रीसाठी हात आधीच पुढे केला आहे. आम्ही सिमला करारावर कटीबद्ध आहोत. आता आम्ही पाकिस्तानच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत." तत्पूर्वी पाकिस्तानी पत्रकारांनी विचारले की दोन्ही शेजारील देशांमध्ये काहीच संपर्क नाही. भारत पाकिस्तानच्या प्रस्तावाला काहीच उत्तर का देत नाही? त्यास उत्तर देताना अकबरुद्दीन म्हणाले, चर्चा सुरू करण्यासाठी दहशतवाद संपुष्टात आणावा लागेल. पाकिस्तान जी भूमिका घेत आहे आणि प्रत्यक्षात जी परिस्थिती आहे, यात खूप फरक आहे. पाकिस्तान जिहाद आणि दहशतवादाला प्रोत्साहन देतं. अर्थातच पाकिस्तान दहशतवादाला आळा घालत नाही, तोपर्यंत चर्चा होणार नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.

X
COMMENT