आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी युद्धनौकेस अंदमान-निकोबारच्या समुद्रातून भारताने हुसकावून लावले

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय नौदलाने भारताच्या अंदमान निकोबारच्या समुद्रात आलेल्या चीनच्या युद्धनौकेला सप्टेंबरमध्ये हुसकावून लावले होते. चीनला स्पष्ट शब्दांत बजावण्यात आले आहे की, त्यांच्या युद्धनौका विनापरवानगी भारताच्या विशेष आर्थिक भागात प्रवेश करू शकत नाहीत, अशी माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल कर्मवीर सिंग यांनी दिली. नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत अॅडमिरल कर्मवीर सिंग यांनी दरवर्षी नौदलाला मिळणाऱ्या निधीत कपात होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, मर्यादित साधनांमध्ये संतुलन बनवण्याचे प्रयत्न सुरू असून यातून नौदलाची क्षमता आणि देशाच्या हितांसोबत कोणताही समझोता केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नौदलाच्या विमानवाहू नौकेच्या आवश्यकतेबाबत बोलताना अॅडमिरल कर्मवीर सिंग यांनी सांगितले की, नौदलाचे प्रमुख या नात्याने त्यांना वाटते की, भारताला तीन विमानवाहू नौकांची गरज आहे. यातील दोन विमानवाहू नौका मोहिमांसाठी कायमच सज्ज राहतील. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, नौदल हिंदी महासागर तसेच दक्षिण चीन समुद्रात चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या हालचालींवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून कोणत्याही प्रकारच्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी नेहमीच सज्ज आहे.

चिनी नौदलाची युद्धनौका भारताच्या भागात उपस्थित राहिल्याबद्दल विचारले असता अॅडमिरल सिंग यांनी सांगितले की, त्या युद्धनौकेला हुसकावून लावण्यात आले होते. भारताच्या परवानगीशिवाय आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात कोणालाही येण्यास परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ते म्हणाले की, हिंदी महासागरात चीनच्या ७ ते ८ युद्धनौका उपस्थित असतात, ज्यांचा हेतू वेगवेगळा असतो. यातील काही समुद्री चाच्यांविरोधातील मोहिमेसाठी तैनात असतात तर काही पाण्यावरील संशोधनासाठी आणि काही समुद्राच्या सर्वेक्षणासाठी तैनात असतात. २००८ पासून चीनने हिंदी महासागरात आपली उपस्थिती वाढवली आहे. चिनी नौदलाच्या हालचाली सतत सुरूच असतात. मात्र त्यावर भारताचे सतत लक्ष असते. आवश्यकता भासल्यास भारतीय नौदल त्वरित कारवाई करत असते.

नौदलासाठी ५० युद्धनौका तयार केल्या जात आहेत. यातील ४८ युद्धनौकांची निर्मिती देशातील शिपयार्डमध्ये केली जात आहे. यावरून नौदलाचे स्वदेेशीकरण व आत्मनिर्भरतेचा अंदाज येतो, असे अॅडमिरल सिंग यांनी सांगितले. देशातच तयार होत असलेल्या आयएनएस विक्रांतच्या प्रगतीबाबत त्यांनी सांगितले की, युद्धनौका निर्मितीबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असून विविध यंत्रांची चाचणी सुरू आहे. ही युद्धनौका २०२१ मध्ये फेब्रुवारी, मार्चपर्यंत नौदलाला प्राप्त होण्याची शक्यता असून त्यानंतर समुद्रात चाचणी घेतली जाईल. त्यानंतर २०२२ मध्ये युद्धनौकेचा वापर सुरू होईल. दुसरी युद्धनौका आयएनएस-२ बद्दल त्यांनी सांगितले की, त्याबाबतची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसून ती लवकर सुरू व्हावी असे नौदलाला वाटते. नौदलाने विविध मोहिमांमध्ये ४४ समुद्री चोरीचे प्रयत्न अयशस्वी केले आणि १२० समुद्री चाच्यांना पकडल्याचेही अॅडमिरल कर्मवीर सिंग यांनी सांगितले.आधुनिकीकरणासाठी निधी वाढवण्याची गरज

अॅडमिरल कर्मवीर सिंग यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, आधुनिकीकरण आणि उपकरणांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नौदलासाठी निधी वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र, उलट निधी कमी केला जात आहे. २०१२- १३ मध्ये नौदलाला संरक्षण बजेटमध्ये १८ टक्के वाटा मिळाला होता. यात वाढ करण्याऐवजी २०१९-२० मध्ये वाटा १३ टक्के करण्यात आला. मर्यादित साधनांच्या बळावर आपली क्षमता वाढवत संतुलन बनवण्याचा प्रयत्न नौदल करत असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाच्या सुरक्षेशी कोणताही समझोता केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानच्या हेतूंबाबत नौदल सजग :


हिंदी महासागरातील पाकिस्तानच्या हेतूंबाबत भारतीय नौदलाला माहिती असून आपले नौदल सतत सजग असल्याचे अॅडमिरल कर्मवीर सिंग यांनी स्पष्ट करत सांगितले की, समुद्राच्या मार्गाने भारतात प्रवेश करू इच्छिणाऱ्या दहशतवाद्यांबाबतही आम्हाला संपूर्ण माहिती आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...