Home | Divya Marathi Special | India should not be a sports fan, it should be a country of sportsmen; says Sachin

आपला देश सर्वात तरुण, मग मधुमेहात क्रमांक एक का? भारत केवळ क्रीडाप्रेमी नव्हे, खेळणाऱ्यांचा देश व्हावा... 

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jan 26, 2019, 09:08 AM IST

‘दिव्य मराठी’सोबत सचिनचे अभियान

  • India should not be a sports fan, it should be a country of sportsmen;  says Sachin

    दिव्य मराठी स्पेशल : आपण कधी विचार केला आहे का की, आपल्या खोलीतील बॅडमिंटन रॅकेट, टेनिस रॅकेट, क्रिकेट बॅट, फुटबॉलवर धूळ का साचली आहे ते? जेव्हा आपण विराटचा कव्हरड्राइव्ह पाहतो किंवा सानियाचा स्मॅश, सायनाचा अविश्वसनीय रिटर्न किंवा सिंधूचा ड्रॉप शॉट पाहतो तेव्हा आपण इतके उत्तेजित का होतो? केवळ आपल्याला पाहणेच पसंत आहे. स्वत: काहीच करत नाही.

    यावरून मला असे वाटते की, आपला देश क्रीडाप्रेमी आहे, मात्र खेळणाऱ्यांचा देश नाही. कारण आपल्याला स्वत: खेळायचे नाही, इतरांचा खेळ पाहण्यातच आनंद वाटतो. आपण सोफ्यावर बसून राहतो टाळ्या वाजवत. आपल्यासमोर असलेली काही आकडेवारी अभिमानास्पद नाही. जसे मधुमेहात आपण जगात क्रमांक १ वर आहोत. स्थूलत्वात आपण तृतीयस्थानी आहोत.

    आपण म्हणतो की आपला देश युवकांचा आहे. असे म्हणत असताना सर्वप्रथम विचार येतो की, तरुण आहोत तर तंदुरुस्त आहोत. सर्वांना तसे वाटते, परंतु मला नाही. कारण आपण सर्व जण तंदुरुस्त असतो तर ही आकडेवारी वेगळी असती. जर आपण जीवनशैली बदलली तरच हे आकडे बदलतील. बहुतेकांची जीवनशैली आरामदायी आहे. त्यांना कोणी जिममध्ये जाण्याचा सल्ला दिला तर ते वारंवार घड्याळ पाहतात अन् १० मिनिटे झाली असे म्हणतात. समजा २० मिनिटांचे नियोजन असेल तर १५ मिनिटांतच ते जिमच्या बाहेर पडतील. मात्र, जेव्हा जेवण्यासाठी बसतील, तेव्हा मात्र १० मिनिटांत जेवण करू असा विचार करत २० मिनिटे झाली तरी तेथून उठणार नाहीत. हे बदलणे गरजेचे आहे. खेळ हा जीवनाचा केवळ पाहण्याचा भाग न बनता खेळण्याचा भाग बनला पाहिजे, हा बदल अत्यंत आवश्यक आहे. मी लहानपणापासून सांघिक खेळ खेळायला सुरुवात केली तेव्हापासून ते भारतीय संघात खेळण्यापर्यंत कोणीही भेदभाव केला नाही. कोणीही तुझा धर्म कोणता? जात कोणती? विचारले नाही. ड्रेसिंग रूममध्ये सर्व एकच होतो. जिंकणेच डोक्यात असायचे. खेळाबरोबरच सांघिक भावना व शिस्त शिकली. मी खूप खोडकर होतो. अचानक एक खोडकर मुलगा शिस्तबद्ध बनला. कारण माझ्यातील सर्व ऊर्जेचा चांगल्यासाठी वापर होत होता. मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हाच देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले. भारताला विश्वचषक जिंकून द्यायचा. हे स्वप्न साकारताना अनेक गोष्टी शिकत गेलो. याची सुरुवात लहानपणीच झाली होती. खेळाइतकेच शिक्षणही महत्त्वाचे आहे हेही मला आई-वडिलांनी शिकवले. मला पूर्ण स्वातंत्र्य होते. मात्र सुविधाही महत्त्वाच्या आहेत.

    मला वाटते की, क्रीडा क्षेत्रासाठी प्रोत्साहन मिळायला हवे. समजा जिल्हा स्तरावर खेळल्यास, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळल्यास बोनस गुण मिळावेत. त्यामुळे ज्या पालकांचा केवळ शिक्षणाचा आग्रह असतो ते पण म्हणतील खेळा आणि बोनस गुण मिळवा, असा बदल होणे शक्य होईल.- सचिन

Trending