आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भारत-श्रीलंका 'मित्रशक्ती' युद्धसराव, भूसुरुंग निकामी करणे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त आयोजन

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : भारत आणि श्रीलंका या दोन देशांचा दरम्यान लष्करी युद्धसराव 'मित्रशक्ती' औंध मिलिटरी स्टेशन येथे सुरू झाला आहे. भूसुरुंग निकामी करणे अाणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही देशांदरम्यानचे सैनिक संयुक्तपणे दहशतवादाविरोधातील कारवाईचे ऑपरेशन कशा प्रकारे राबवयाचे याची रणनीती प्रत्यक्ष युद्धभूमीवर अनुभवत अाहेत.

दहशतवादाविराेधात एखादी ठाेस कारवाई करण्याकरिता वेगवेगळ्या देशांच्या सैनिकांत समन्वय असणे ही महत्त्वपूर्ण बाब असते. दहशतवाद ही जगाला भेडसावणारी समस्या असून त्याविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्र येत त्याचा बीमोड करणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून भारत आणि श्रीलंकेचे २४० जवान या युद्धसरावात सहभागी झाले आहेत.

दोन आठवड्यांच्या युद्धसरावात घनदाट जंगलातील अतिरेकी करवायांना चोख प्रत्युत्तर देणे, संशयास्पद वस्तूंची तपासणी करणे, अतिरेक्यांचा शाेध घेऊन त्यांचा बीमोड करणे आणि सुरक्षेचा दृष्टीने जंगलातील संरक्षित भाग स्वतःचा अधिपत्याखाली आणणे, या गोष्टींवर सराव केल जात अाहे. दहशतवादी कारवाईप्रसंगी हेलिकॉप्टरच्या साह्याने संबंधित घटनास्थळी पोहोचून तत्काळ मदतकार्य करणे. ड्रोनच्या मदतीने आक्षेपार्ह घटना टिपणे, अतिरेक्यांचा माग काढून त्यांचा बंदोबस्त करणे यासंदर्भात जवानांकडून सराव केला जात आहे. विविध ठिकाणी पेरण्यात आलेले भूसुरुंग ओळखणे अाणि ते निकामी करण्याकरिता विविध तंत्रज्ञानांचा अवलंब करणे. सार्वजनिक ठिकाणी पेरण्यात आलेले भूसुरुंग ओळखून खबरदारी घेणे याबाबत जवानांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.

श्रीलंका लष्कराचे कर्नल बाथिया मदनायिका यांनी सांगितले की, भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान हा सातवा संयुक्त युद्धसराव होत आहे. श्रीलंकन आर्मीचे १२० जवान या युद्धसरावात सहभागी झाले आहेत. मागील वेळी श्रीलंकेत या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय लष्कराने या सरावाचे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर कशा प्रकारे संयुक्तपणे कारवाई करता येईल याची देवाणघेवाण सैनिकांमध्ये केली जात आहे. हा आमच्या सैनिकांसाठी चांगला अनुभव आहे.

सायबर धोक्यांवर चर्चा

बदलत्या काळात युद्धाचे स्वरूप बदलत असून सायबर हल्ल्याच्या माध्यमातून शत्रुराष्ट्राबाबत गैरसमज पसरवणे, शस्त्रांची व सैनिकांची माहिती मिळवणे अशा मार्गांचा अवलंब केला जात आहे. या दृष्टिकोनातून दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांत सायबर धोक्यांवर चर्चा करण्यात येत आहे.

जागतिक शांततेसाठी उपयुक्त

या युद्धसरावात भारताची ११ कुमाऊ बटालियन व श्रीलंकेची जेमुनू वॉच बटालियन सहभागी झाली आहे. दोन्ही देशांच्या संयुक्त ड्रीलद्वारे ऑपरेशन राबवण्याचा प्रयत्न आहे. जागतिक शांततेसाठी अशा सरावांचा उपयोग होऊ शकेल. कर्नल वीरेंद्र अाडकर (भारतीय लष्कर)