आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडी उत्पादनात देश जगात तिसरा, पण खाण्यात मागे; राज्यात पोल्ट्री उद्योगावर दहा हजार कुटुंबे अवलंबून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंडे शाकाहारी की मांसाहारी? या विषयावरची चर्चा सुरू असताना पोल्ट्री व्यवसायाच्या उलाढालीची, प्रत्यक्ष वापराची आकडेवारी रंजक आहे. ज्या घटकाच्या उत्पादनात देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे त्या अंड्याच्या सेवनात मात्र देशाचा जगात शेवटचा क्रमांक लागतो. देशात कोंबड्यांचा मुख्य आहार असणाऱ्या मक्याचे क्षेत्र ८० लाख हेक्टर आहे. त्यामुळे देशातील कृषी क्षेत्र विविध कारणांनी अडचणीत असूनही पोल्ट्री उद्योगाने मात्र वीस वर्षे आठ टक्के इतका विकास दर कायम ठेवला आहे. ‘व्हेटस इन पोल्ट्री’ (व्हीआयपी) या पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय देशपांडे यांनी ही माहिती दिली.  ‘देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण असला तरी पोषण सुरक्षेत फारच मागे आहे. देशातील ३८ टक्के मुले कुपोषित आणि ५० टक्क्यांहून अधिक महिला अशक्त (अॅनिमिक) आहेत, असे नीती आयोगाने नुकतेच जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर, अंडी उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या आपल्या देशात अंडी सेवनाचे प्रमाण नगण्य आहे, असे डॉ. देशपांडे म्हणाले. अंडी सेवनात (दरडोई) चीन (३४८), अमेरिका (२५३) अशी आकडेवारी असताना देशात हे प्रमाण अवघे ६९ आहे. ब्रॉयलर्स उत्पादनात देश जगात चौथ्या क्रमांकावर आहे. पण पोषण सुरक्षेत आपला देश विकसनशील देशांच्या तुलनेतही फार मागे आहे, असे निरीक्षण डॉ. देशपांडे यांनी नोंदवले.
 

या क्षेत्रात १२ हजार प्रत्यक्ष राेजगार
राज्यात पोल्ट्री उद्योगावर सुमारे दहा हजार शेतकरी कुटुंबे अवलंबून आहेत, तर १२ हजार लोकांना पोल्ट्री उद्योगात थेट रोजगार आहे. चिकन सेंटर्सवर सुमारे १५ हजार कुटुंबे अवलंबून आहेत. राज्यात मक्याचे क्षेत्र सुमारे १० लाख हेक्टर, तर सोयाबीन क्षेत्र ३५ लाख हेक्टरच्या आसपास आहे, जे पोल्ट्री उद्योगावर आधारले आहे.

 

आहारशैलीचाही होतो प्रभाव
भारतीयांच्या जीवनशैलीवर शाकाहाराचा प्रभाव आहे. देशातील ९१ टक्के लोक शाकाहारी आहेत, तर ८५ टक्के लोक मिश्राहारी आहेत. त्यापैकी ८८ टक्के नागरिकांमध्ये प्रथिनांची कमतरता आहे. त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणे त्यांना सर्वाधिक सतावतात. पोषण सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.

 

पोल्ट्री उद्योगामुळे शेतीपूरक रोजगारामध्ये मोठी वाढ :

व्हेटस इन पोल्ट्रीचे सचिव डॉ. संतोष इरे म्हणाले,‘पोल्ट्री उद्योगाची उलाढाल एक लाख कोटींवर पोहोचली आहे. २३ कोटी अंडी आणि २ कोटी किलो चिकन ही देशाची दैनंदिन गरज आहे. कोंबड्यांचे मुख्य खाद्य असणाऱ्या मक्याचे क्षेत्र ८० लाख हेक्टर आहे. लाखो एकरांवरील सोयाबीन शेतीही पोल्ट्री उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे देशातील कृषी क्षेत्र अडचणीत असूनही पोल्ट्री व्यवसायाने आठ टक्के विकास दर गेली वीस वर्षे सातत्याने कायम राखला हे उल्लेखनीय आहे.

 

सर्वाधिक पाेषणमूल्ययुक्त अंडी भारतामध्ये
जगात सर्वात सुरक्षित आणि पोषणमूल्ययुक्त अंडी भारतात उत्पादित होतात. जगातील सर्व विकसित देशांत जीएमओ (जनुकीय बदल केलेले) मका आणि सोयाबीन पोल्ट्री खाद्यात वापरले जातात. मात्र भारतात मका आणि सोयाबीन नॉन जीएमओ प्रकारातील आहेत. त्यामुळे आपल्या अंड्यांना निर्यातीतही मोठी मागणी असते.
- डॉ. अजय देशपांडे, अध्यक्ष, व्हेट्स इन पोल्ट्री

बातम्या आणखी आहेत...