Home | Sports | From The Field | india vs australia ODI Series australia win

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध दहा वर्षांनी जिंकली वनडे मालिका; शतक ठोकणारा ख्वाजा ठरला मालिकावीर

वृत्तसंस्था | Update - Mar 14, 2019, 09:21 AM IST

रोहित शर्माच्या अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा 35 धावांनी झाला पराभव 

 • india vs australia ODI Series australia win

  नवी दिल्ली - पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने अखेरच्या व पाचव्या वनडेत टीम इंडियाला ३५ धावांनी पराभूत करत ३-२ ने मालिका विजय मिळवला. शतकवीर उस्मान ख्वाजा सामनावीर व मालिकावीर ठरला.


  फिरोजशहा कोटला स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर उस्मान ख्वाजाचे (१००) शानदार शतक आणि हँडसकाॅम्बच्या (५२) अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ९ बाद २७२ धावा उभारल्या. यात ख्वाजाने मालिकेतील दुसरे शतक झळकावले. तो भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत दोन शतके ठोकणारा आॅस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू बनला. त्याने ५ सामन्यांच्या मालिकेत २ शतके व २ अर्धशतकांसह ३८३ धावा काढल्या.


  प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २३७ धावा करू शकला. यात सलामीवीर रोहित शर्माने ८९ चेंडूत ४ चौकारांसह ५६ धावांची संथ फलंदाजी केली. रोहितचे वनडेत ८ हजार धावा पूर्ण झाल्या. शिखर धवन १२, विराट कोहली २०, ऋषभ पंत १६, विजय शंकर १६ धावांवर परतले. केदार जाधवने ५७ चेंडूत ४ चौकार व एक षटकार खेचत ४४ केल्या. भुवनेश्वर कुमारने फटकेबाजी करत ५४ चेंडूत ३ चौकार व २ षटकार लगावत ४६ धावा काढल्या.

  भारताने ८ धावा देत घेतले तीन बळी
  ऑस्ट्रेलियाचा ख्वाजा १०० धावांवर असताना भुवनेश्वरने त्याला कोहलीच्या हाती झेलबाद केले. ग्लेन मॅक्सवेल एका धावेवर जडेजाच्या चेंडूवर बाद झाला. तेव्हा संघाची धावसंख्या १७८ होती. हँडसकाॅम्बला शमीने यष्टीमागे झेलबाद केले. भारताने ८ धावांच्या अंतरात ऑस्ट्रेलियाचे ३ बळी घेत सामन्यावर पकड निर्माण केली. ऑस्ट्रेलियाने पुढील ४७ धावांत ३ विकेट गमावल्या. मात्र, डावात ४८ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर १९ धावा ऑस्ट्रेलियाने जमा केल्या. ५० षटकांत २७२ धावांवर डाव संपला. भारताकडून भुवनेश्वरने ३ बळी, मो. शमी आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.


  ख्वाजाने सामन्यात रचले फलंदाजीतील विक्रम
  ख्वाजा भारताविरुद्ध एकाच मालिकेत सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज बनला. मात्र, हा विक्रम ५ वनडे खेळवलेल्या द्विपक्षीय मालिकेतील आहे. त्याचप्रमाणे तो ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याही वनडे मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी पोहोचला. डेव्हिड वॉर्नर अव्वल स्थानी आहे. त्याने २०१६ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेत ३८६ धावा केल्या. ख्वाजाने मालिकेत ४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

  भारतात पाच सामन्यांच्या मालिकेतील सर्वाधिक धावा

  धावा देश वर्ष
  ३८३ ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) २०१९
  ३५८ डिव्हिलर्स (द.आफ्रिका) २०१५
  ३५३ गॉर्डन ग्रीनिज (विंडीज) १९८३
  ३५३ दिलशान (श्रीलंका) २००९


  झंम्पा चमकला : गोलंदाजीत अॅडम झम्पाने ४६ धावा देत ३ बळी घेतले. कमिन्स, रिचर्डसन आणि स्टाइनिसने प्रत्येकी २ बळी घेतले.


  सामन्यात दाेन अर्धशतकी भागीदाऱ्या
  ख्वाजाने १०६ चेंडूंत १० चौकार व २ षटकार खेचत १०० धावा काढल्या. त्याने सामन्यात दोन अर्धशतकी भागीदाऱ्या रचल्या. त्याने पहिल्या विकेटसाठी अॅरोन फिंच (२७) सोबत ७६ धावा जोडल्या. त्यानंतर पीटर हँडसकाॅम्बसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. ख्वाजा व फिंचने मालिकेत तिसऱ्यांदा ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. २००० नंतर भारताविरुद्ध चौथ्यांदा द्विपक्षीय मालिकेत तीनपेक्षा अधिक जोडीने ५० पेक्षा अधिक भागीदाऱ्या केल्या आहेत. श्रीलंकाने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाने २०१३ व २०१७ मध्ये द्विपक्षीय मालिकेत ३-३ वेळा पहिल्या विकेटसाठी ५० पेक्षा अधिक धावा केल्या. जडेजाने फिंचला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.

Trending