आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शर्माचे शानदार अर्धशतक; पाकिस्तानवर आठ गड्यांनी विजय; भुवनेश्वर, केदारच्या प्रत्येकी ३ विकेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- कर्णधार रोहित शर्माच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने आशिया कपमध्ये बुधवारी पाकिस्तानला ८ गड्यांनी पराभूत केले. प्रत्येकी तीन विकेट घेणारे गोलंदाज भुवनेश्वर कुमार व केदार जाधवदेखील विजयाचे शिल्पकार ठरले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला भारताने ४३.१ षटकांत अवघ्या १६२ धावांवर रोखले. भारताने २९ षटकांत २ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. 


भारताने १० वर्षांनंतर आशिया कपमध्ये सलग दोन दिवसांत दोन विजय मिळवलेे. यापूर्वी २००८ मध्ये भारताने दोन्ही दिवसांत हाँगकाँग आणि पाकिस्तानला पराभूत केले होते. 


सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३९ चेंडूंत ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचत ५२ धावा ठाेकल्या. त्याला शादाब खानने त्रिफळाचीत केले. दुसरा सलामीवीर शिखर धवन अापले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. त्याने ५४ चेंडूत ६ चौकार व एक षटकार खेचत ४६ धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या अंबाती रायडूने ४६ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद ३१ धावा केल्या. दिनेश कार्तिकने ३७ चेंडूत नाबाद ३१ धावांची विजयी खेळी केली. त्याने २ चौकार व एक षटकार खेचला. पाकिस्तानकडून फहिम अशरफ व शादाब खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 


बाबरची एकाकी लढत

पाकिस्तानकडून बाबर आझमने एकाकी लढत देत सर्वाधिक ४७ धावा काढल्या. शोएब मलिकने ४३ धावा जोडल्या. ही पाकिस्तानची भारताविरुद्ध गेल्या पाच वर्षांतील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी ६ जानेवारी २०१३ मध्ये पाकिस्तानने दिल्लीमध्ये झालेल्या वनडे सामन्यात १५७ धावा काढल्या होत्या. पाकिस्तानी संघ दुबईमध्ये पहिल्यांदा २०० धावांच्या आत ढेपाळला आहे. पाकिस्तानला तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. भुवनेश्वरने सलामीवीर इमाम उल हकला २ धावांवर असताना यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हाती झेलबाद केले. भुवनेश्वरने त्यानंतर फखर जमानलादेखील तंबूत पाठवले. फखर भोपळाही फोडू शकला नाही. त्याचा चहलने झेल घेतला. अवघ्या ३ धावांवर २ गडी गमावल्यानंतर बाबर आझम आणि अनुभवी फलंदाज शोएब मलिकने संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. धोकादायक ठरणारी ही जोडी कुलदीप यादवने फोडली. त्याने आझमला त्रिफाळाचीत केले. बाबरने ६२ चेंडूत ४७ धावा काढल्या. त्याने सहा चौकारदेखील लगावले. 


शोएब मलिकला दोनदा जीवनदान 
पाकिस्तानचा माजी कर्णधार व अनुभवी खेळाडू शोएब मलिकला भारतीय खेळाडूंनी दोन वेळा जीवदान दिले तरीदेखील शोएब मोठी खेळी करू शकला नाही. यष्टीमागील सर्वात चपळ यष्टिरक्षक असलेल्या महेंद्रसिंग धोनीने त्याचा झेल सोडला. त्या वेळी शोएब अवघ्या २६ धावांवर खेळत होता. भुवनेश्वर कुमारनेदेखील त्यांचा झेल सोडला होता. शोएब मलिक अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. अंबाती रायडूच्या थेट फेकीवर तो धावबाद झाला. त्याने ६७ चेंडूंचा सामना करताना एक चौकार व एक षटकार खेचत ४३ धावा काढल्या. कर्णधार सरफराज अहमदला (६), आसिफ अली (९) आणि शादाब खानला (८) या केदारने गुंडाळले. फहीम अशरफ (२१) व मोहंमद आमिरने आठव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. 


भुवनेश्वर सामनावीर; केदार जाधव चमकला 
भारताच्या विजयात समानावीर ठरलेला भुवनेश्वर कुमार आणि पार्ट टाईम गोलंदाज केदार जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. या दोघांनी प्रत्येकी ३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भुवनेश्वरने तिसऱ्या षटकात इमाम उल हकला बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. भुवनने ७ षटकांत १५ धावांवर ३ आणि केदारने ९ षटकांत २३ धावा देत ३ बळी घेतले. 


पंड्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेले 
सामन्याच्या अठराव्या षटकांतील आपल्या पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्याच्या पाठीत उसण भरली. त्यामुळे त्याला मोठा त्रास झाला. तो उभेदेखील राहू शकत नव्हता. त्यामुळे वैद्यकीय टीमने त्याला त्वरित स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेले. तो मैदानावर परतला नाही. त्याची फलंदाजीला येण्याची शक्यता नव्हती. 

 

पुढे पाहा मॅचचे संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...