आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी व श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती गाेतबाया राजपक्षे यांच्यात शुक्रवारी द्विपक्षीय यशस्वी चर्चा झाली. त्यात भारताने श्रीलंकेला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २ हजार ८६५ कोटी रुपयांची कर्ज देण्याचे ठरवले आहे, तर दहशतवादविराेधी माेहिमेसाठी ३५८ कोटी रुपये देण्यात येतील, असे पंतप्रधान माेदींनी जाहीर केले.
उभय नेत्यांतील चर्चेच्या केंद्रस्थानी श्रीलंकेतील तामिळ समुदायाच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे असा मुद्दा हाेता. त्याशिवाय दाेन्ही देशांतील सुरक्षा, व्यापारी संबंधी आणि मासेमारांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. श्रीलंकेच्या गतिमान विकासासाठी भारत भरीव मदत देण्यास तयार असल्याचे आश्वासन माेदींनी गाेतबाया यांना दिले. श्रीलंकेत याचवर्षी एप्रिलमध्ये साखळी बाँबस्फाेट झाले हाेते. त्यात किमान २५० जणांना प्राण गमवावे लागले. त्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताने श्रीलंकेला ५० काेटी डाॅलर्सची मदत दिली आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपाक्षे यांनी परदेशात दौऱ्यात पहिला टप्पा म्हणून भारताची निवड केली. हा भारतीय कूटनीतीचा मोठा विजय ठरतो. कारण श्रीलंकेतील सत्ता परिवर्तनानंतर चीन तेथे पुन्हा आपला दबदबा निर्माण करू इच्छित होता. परंतु, नूतन राष्ट्रपतींनी चीनच्या दबावाखाली न येता भारताला भेट देणे महत्त्वाचे मानले. त्यातून चीनला अघोषित संदेश आहे. श्रीलंका यापुढे आपल्या चांगल्या संबंधामध्ये भारताला प्राधान्य देणार हे त्यातून स्पष्टपणे लक्षात येते. भारतासोबत चांगले संबंध निर्माण करावेे असा देशातून दबाव वाढतानाचा हा काळ अाहे. त्यातच गोतबाया राष्ट्रपती पदावर निवडले गेले. दुसरीकडे भारतीय कंपन्या श्रीलंकेतील मोठ्या प्रकल्पांत भागीदार आहेत. गोतबाया भारतानंतर पाकिस्तानलाही भेट देणार आहेत. पाकिस्तानमध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे. म्हणूनच ते पाकिस्तानला जवळून आेळखतात. परंतु, श्रीलंकेत झालेल्या मोठ्या हल्ल्याचे तार पाकिस्तानशी जुळले होते, हे देखील तेवढेच खरे. हल्ल्याची गुप्त माहिती भारताने श्रीलंकेला दिली होती. हा दौरा पूर्ण केल्यानंतर गोतबाया पाकिस्तानात जाऊन हल्ल्याबाबत चांगल्याप्रकारे म्हणणे पाक सत्ताधीशांपुढे मांडू शकतील.
भारताच्या मासेमारी बोटी लवकरच सोडणार : गाेतबाया
श्रीलंका-भारत यांच्यातील संबंध उच्च पातळीवर घेऊन जाण्याचे माझे प्रयत्न आहेत. माझ्या कार्यकाळात उभय देशांतील संबंधाला दृढ करण्यावर माझा भर दिसेल. इतिहासात आणि राजकीय पातळीवरही दाेन्ही देशांचे संबंध चांगले राहिलेले आहेत. त्याचबरोबर भारतीय मासेमाराच्या ताब्यातील बोटीही लवकर सोडल्या जातील , असे श्रीलंकेचे राष्ट्रपती गाेतबाया यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासाेबत झालेल्या चर्चेत आर्थिक सहकार्याच्या पातळीवर चर्चा झाली, अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रपती भवन येथे त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद झाला. गृहयुद्ध संपवण्यात माेठी भूमिका घेणारा नेता अशी राजपाक्षे यांची आेळख आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.