आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने तिसऱ्यांदा शिकवला धडा; पीओकेत २० पाक सैनिक-अतिरेकी मारले, चार कॅम्प उद्ध्वस्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहित कंधारी 

जम्मू  - भारतीय लष्कराने रविवारी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट हाणून पाडत पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यात बोफोर्ससारख्या तोफांनी हल्ला करत दहशतवाद्यांचे ४ लाँचपॅड (तळ) उद््ध्वस्त केले. शनिवारी रात्री उशिरा पाकिस्तानी लष्कराचे जवान तंगधारमध्ये सतत गोळीबार करत होते. यात रविवारी सकाळी दोन भारतीय जवान शहीद झाले. एक नागरिकही ठार झाला. याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दोन तासांच्या आत पाकिस्तानी लष्कराच्या सुरक्षेखाली सुरू असलेले दहशतवाद्यांचे चार तळ तोफगोळ्यांनी उद््ध्वस्त केले. लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले की, या कारवाईत ६ ते १० पाकिस्तानी जवान आणि तितकेच दहशतवादी मारले गेले आहेत. दुसरीकडे, पाकनेही झालेल्या नुकसानीला पुष्टी दिली. मात्र जवान  किंवा अतिरेकी मारले गेले नसल्याचे म्हटले आहे. 
 

हल्ला नीलम खोऱ्यातच का ? 

हिवाळ्याआधी पीओकेच्या २४ लाँचपॅडहून घुसखोरीचा कट 
एका लष्करी कमांडरनुसार, २९ सप्टेंबर २०१६ च्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पीओकेच्या नीलम खोऱ्यात दहशतवादी कॅम्प तयार होऊ शकले नव्हते, पण आता काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी पाक लष्कराने तेथे पुन्हा २४ लाँचपॅड तयार केले आहेत. लष्कर आणि जैशचे २०० पेक्षा जास्त दहशतवादी पाक लष्कराच्या सुरक्षेत या लाँचपॅडवर आहेत. बर्फवृष्टी सुरू होणार आहे त्यामुळे त्याआधीच अतिरेक्यांनी सीमा पार करावी, अशी पाक लष्कराची इच्छा आहे. त्यामुळेच नीलम घाटीच्या ५-६ लष्करी मोर्चांवरून भारतीय चौक्यांवर सतत गोळीबार होत आहे. पण भारताने घुसखोरी रोखण्यासाठी मुख्य लाँचपॅडच नष्ट केले आहेत.
 

पीओकेतून ग्राउंड रिपोर्ट : भारतीय सैन्याच्या तोफांनी दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅडवर केला अचूक मारा
 

पीओकेच्या शाहकोट येथून “दिव्य मराठी’साठी अकबर अली  - पीओकेच्या जुरा, शाहकोट आणि नौशेरी भागात भारताकडून जास्त गोळीबार झाला आहे. त्यामुळे पाकची भारतासोबत हॉटलाइनवर चर्चा सुरू झाली आहे. कारण भारताचा मारा अचूक आहे. या भागात दहशतवादी बंकर तयार करून राहतात. किती अतिरेकी ठार झाले हे सांगण्यास कोणताही लष्करी अधिकारी तयार नाही. पण दहशतवाद्यांसाठी तयार केलेल्या लष्कराच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे भारतीय बाजूला तीन किमीपर्यंत लोक राहत नाहीत, फक्त चौक्या आहेत. पण पीओकेत एलओसीजवळ दाट लोकसंख्या आहे. मध्ये-मध्ये अतिरेक्यांचे बंकर आहेत. त्यामुळे नुकसान पीओकेतच जास्त झाले आहे. आता थंडी वाढली की घुसखोरी करणे कठीण होईल आणि घुसखोरी झाली नाही तर काश्मिरात शांतता राहील. त्याचा परिणाम पाकच्या राजकीय-लष्करी क्षेत्रात दिसेल.
 
 

शहिदांसाठी घेतला बदला, पाक सुधारला नाही तर आणखी मोठा हल्ला करू
काश्मीरमध्ये अशांतता पसरावी म्हणून  घुसखोरी करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. आमच्या दोन शहीद साथीदारांसाठी बदला घेतला. पाकच्या धोरणात  बदल झाला नाही तर आणखी मोठा हल्ला करू.
- जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख