आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्म नव्हे, भारतीय संविधान सध्या धोक्यात : कन्हैयाकुमार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात देशातल्या १४ युवा संघटनांनी 'युनायटेड यूथ फ्रंट'च्या झेंड्याखाली एकत्र येत रविवारी मुंबईत 'राजगृह ते चैत्यभूमी' मार्गावर विशाल संविधान बचाव रॅली काढली. त्यामध्ये हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, कन्हैयाकुमार हे देशातील युवा नेते सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात नसून भारतीय संविधान धोक्यात आहे' असा दावा केला. रविवारी मुंबईत संविधान बचावच्या दोन रॅली निघाल्या. एक राजगृह येथून, तर दुसरी देवनार-गोवंडी येथून काढण्यात आली. दोन्ही रॅली दादरच्या चैत्यभूमीवर विसर्जित करण्यात आल्या.


देशात कोणताही धर्म धोक्यात नसून भारतीय संविधान धोक्यात आहे, असा दावा जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारने केला. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क दिला. तो हक्क संपुष्टात आणण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केला.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निषेधाच्या घोषणा देण्याची व राज्यघटना जाळण्यापर्यंत काही संघटनांमध्ये हिंमत आली अाहे. ही भारतीय संविधानासाठी मोठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने दिला. भारतीय राज्यघटनेची प्रत सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आली हाेती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या दादरच्या हिंदू काॅलनीतील राजगृह इमारतीपासून रॅलीस प्रारंभ झाला. यात हजारो युवक सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची रॅलीच्या नियोजनात मुख्य भूमिका होती. या वेळी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर युवा नेत्यांनी बोट ठेवत टीका केली.

सुमारे ४ हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा सहभाग
दुसरी रॅली देवनार-गोवंडी येथून काढण्यात आली. त्यात काँग्रेसचे संजय निरुपम, डाॅ. भालचंद्र मुणगेकर, एकनाथ गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड सहभागी झाले हाेते. सुमारे चार हजार कार्यकर्ते रॅलीत सहभागी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. तो दिवस संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) पाळण्यात येतो. पण रविवार आल्याने व सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज असल्याने पूर्वसंध्येलाच संविधान दिनाच्या रॅलीजचे आयोजन करण्यात आले होते

 

बातम्या आणखी आहेत...