BCCI / कोच शास्त्रींकडे 26 महिन्यांत होत्या चार मोठ्या संधी, तीनमध्ये संघ अपयशी

शास्त्रींना या कारणाने बाहेर केले जाऊ शकते

दिव्य मराठी

Jul 17,2019 12:46:00 PM IST

नवी दिल्ली - १९८३ विश्वविजेत्या संघातील रवी शास्त्री यांना जुलै २०१७ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले होते. ते यापूर्वी संघाचे संचालक होते. ५७ वर्षीय शास्त्री भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पसंती होती. शास्त्रींना प्रशिक्षक म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चार संधी मिळाल्या, मात्र ते तीनमध्ये अपयशी ठरले. संघ दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकला नाही. गेल्या आठवड्यात विश्वचषकाच्या फायनलमध्येही संघ पोहोचू शकला नाही. केवळ ऑस्ट्रेलियात संघाने पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली, हे एकमेव मोठे यश ठरले. बीसीसीआयने मंगळवारी नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले. त्यासाठी शास्त्रींनाही अर्ज करावा लागेल. नव्या प्रशिक्षकासाठी ६० वर्षे वयाची अट ठेवण्यात आली आहे. ३० जुलैपर्यंत अर्ज पाठवता येऊ शकतो.


शास्त्रींचा कार्यकाळ ३ ऑगस्ट विंडीज दौऱ्यापर्यंत वाढवला आहे. म्हणून एकूण २६ महिने ते संघाचे प्रशिक्षक राहतील. आता या प्रदर्शनाच्या आधारे शास्त्री पुन्हा प्रशिक्षक बनतात की मंडळ दुसऱ्याला संधी देते, हे लवकरच समजेल. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला पराभवाला सामाेरे जावे लागले. याच पराभवाचे हे एक कारण आहे. त्यानंतर शास्त्रींनी मधल्या फळीत एका चांगल्या फलंदाजाची आवश्यकता होती, असे स्वत: काेच शास्त्री यांनी सांगितले आहे.


प्रशिक्षकासाठी ३ अटी ठेवण्यात आल्या
गेल्या वर्षी प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ९ गोष्टींवर माहिती मागवली होती. यात कोणतीही माहिती स्पष्ट केली नाही. यंदा केवळ तीनच अटी ठेवल्या.
1. अर्जदाराने कसोटीत खेळणाऱ्या देशाला कमीत कमी दोन वर्षांपर्यंत किंवा अव्वल दर्जाची टीम, अ संघ, आयपीएल संघाला ३ वर्षांपर्यंत प्रशिक्षण दिलेले असावे.
2. अर्जदाराला ३० कसोटी किंवा ५० वनडे खेळण्याचा अनुभव असावा.
3. अर्जदाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.


शास्त्रींना या कारणाने बाहेर केले जाऊ शकते :
- दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका १-२ ने आणि इंग्लंडमध्ये १-४ ने गमावली. म्हणजे आठपैकी केवळ २ कसोटी जिंकल्या. सहामध्ये पराभव झाला. केवळ २५ टक्के सामने जिंकू शकले. टीम इंडिया विश्वचषकाची दावेदार होती, मात्र फायनलमध्ये पोहोचू शकली नाही.
- गेल्या दोन वर्षांपासून वनडे संघातील नंबर चार या स्थानाची समस्या सोडवू शकले नाही.


शास्त्री कायम यामुळे राहू शकतात : भारतीय संघाला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका २-१ ने जिंकून दिली. टीम इंडियाला विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले. शास्त्री कर्णधार कोहलीचे आवडते प्रशिक्षक आहेत.

X