Home | Sports | Cricket | Off The Field | Indian premiere league and lok sabha elections securities

IPL 2019: निवडणुकांच्या गर्दीत 'आयपीएल' सुरक्षेबाबत अनभिज्ञता; दुसऱ्या टप्प्याचे सामने 'यूएई'मध्ये

विनायक दळवी | Update - Mar 17, 2019, 11:51 AM IST

बीसीसीआयचे तोंडावर बोट; आयपीएल कौन्सिलच अस्तित्वात नाही

 • Indian premiere league and lok sabha elections securities

  मुंबई - देशाच्या निवडणुका महत्त्वाच्या, इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) सामने की नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची याबाबत देशभरातील पोलिस यंत्रणांना सध्या प्रश्न पडला आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मंत्रालयातील बैठकीतदेखील हाच सूर व्यक्त झाला. त्यामुळे आयपीएल दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमाची घोषणा अद्याप केली जात नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यास सुरक्षा व्यवस्था देण्यास असमर्थता व्यक्त केली गेली तर दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवण्याचा विचारही सुरू आहे.


  पुलवामा आणि बालाकोट येथील घटनांनंतर भारताप्रमाणे पाकिस्तानातही तणावाचे वातावरण आहे. २००९ मधील निवडणुकांच्या वेळी उभय देशांमध्ये असे तणावाचे वातावरण नव्हते. त्यामुळे जनसमुदाय किंवा गर्दी होणाऱ्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलिसांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत आयपीएलसारख्या छानशौकीच्या स्पर्धेसाठी कितपत धोका पत्करायचा असा सवालही केला जात आहे. न्यूझीलंडमध्ये हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तर क्रिकेटपटू, क्रिकेटरसिक हे अशी कृत्ये करणाऱ्यांसाठी सहजसाध्य लक्ष्य ठरू शकेल याची जाणीव संबंधितांना आहे.


  देशात कडक सुरक्षा व्यवस्थेची गरज
  निवडणुकांना विविध टप्प्यांसाठी सुरक्षा व्यवस्था राबवत असताना आयपीएलसारख्या करमणुकीच्या क्रिकेटवर पोलिस यंत्रणा किती लक्ष देऊ शकेल, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दहशतवादी हल्ल्याची भीती आणि सततचे दडपण अशा वातावरणात सामने राज्याबाहेर किंवा देशाबाहेर खेळवले जावेत अशी विनंती सुरक्षा व्यवस्था करणाऱ्यांच्या वतीने बीसीसीआयला केली जाण्याची शक्यता आहे.


  बीसीसीआयचे तोंडावर बोट; आयपीएल कौन्सिलच अस्तित्वात नाही
  बीसीसीआयने फ्रँचायझीचे हित जपण्यासाठी पुरस्कर्ते मिळवण्याचा मार्ग सुकर केला. यासाठी १७ सामन्यांचा आयपीएल पहिला टप्पा जाहीर केला. मात्र, त्यानंतर निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बीसीसीआयमध्ये सध्या शांतता आहे. आयपीएल कौन्सिलच सध्या अस्तित्वात नसल्यामुळे विनोद राय हेच प्रशासकांच्या वतीने निर्णय घेणार आहेत. बीसीसीआयच्या विविध यंत्रणांकडूनही या वेळी किती पाठिंबा मिळेल हेही गुलदस्त्यात आहे.

Trending