Home | Sports | Cricket | Off The Field | India's 14th defeat in one day series in Sydney

भारताचा सिडनीत 14 वा पराभव; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, 34 धावांनी भारतावर मात  

वृत्तसंस्था | Update - Jan 13, 2019, 08:44 AM IST

एक हजारावा विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ ठरला आहे. 

 • India's 14th defeat in one day series in Sydney

  सिडनी- कसाेटी मालिका पराभवातून सावरलेला यजमान ऑस्ट्रेलिया संघ आता विजयी ट्रॅकवर परतला आहे. ऑस्ट्रेलियाने सलामीच्या वनडे सामन्यात शनिवारी पाहुण्या टीम इंडियाला धूळ चारली. यजमानांनी ३४ धावांनी सलामीचा सामना जिंकला. यासह टीमने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा वनडे सामना मंगळवारी अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतासाठी निर्णायक आहे. त्यामुळे आता या सामन्यात बाजी मारण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल. भारताला सिडनीच्या मैदानावर १४ व्या वनडेत पराभवाचा सामना करावा लागला. तसेच आशियाबाहेर ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर भारताला सर्वाधिक वेळा पराभवाला सामाेरे जावे लागले.

  प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५ बाद २८८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताला ९ गड्यांच्या माेबदल्यात २५४ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या सलामी विजयासाठी राेहित शर्मा (१३३) आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने (५१) तुफानी खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांच्या अपयशामुळे टीमला पराभवाला सामाेेरे जावे लागले. त्यामुळे या दाेघांचाही झंझावात व्यर्थ ठरला. या खेळीच्या बळावर त्यांनी आपापल्या गटात विक्रमाला गवसणी घातली.

  राेहित-धाेनीची शतकी भागीदारी :
  खडतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मात्र, यातून राेहित आणि धाेनीला संघाला बाहेर काढण्यासाठी कंबर कसली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. यासह त्यांनी १३७ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली.

  धाेनी दसहजारी; पाचवा भारतीय
  सामन्यादरम्यान धाेनीने ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह त्याने ओव्हरऑल १० हजार धावा पूर्ण केल्या. अशा प्रकारे दसहजारी हाेणारा धाेनी हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. धाेनीने ३३० सामन्यांत ५० च्या सरासरीने १० हजार ५० धावांची नाेंद आपल्या नावे केली. यात ९ शतकांसह ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने डिसेंबर २०१७ नंतर प्रथमच अर्धशतक साजरे केले.

  राेहितचे चाैथे शतक; सर्वच पराभव
  भारताकडून राेहित शर्माने १३३ धावांची खेळी केली. मात्र, त्याला आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये यजमानांविरुद्ध चाैथे शतक साजरे केले. मात्र, या चारही वेळा ताे टीमचा पराभव टाळू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करतानाचे राेहितचे हे १० वे शतक ठरले.

Trending