आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

119 गोपिकांना 85 वर्षांच्या माई देतात तोल सांभाळण्याचे प्रशिक्षण, भारतातील महिलांचे पहिले दहीहंडी पथक आज जालना शहरामध्ये

एका वर्षापूर्वीलेखक: सुनील चौधरी
  • कॉपी लिंक

लहू गाढे | जालना  भारतातील पहिले महिलांचे दहीकाला पथक दहीहंडी फोडण्यासाठी शनिवारी जालन्यात येत आहे. गोकुळाष्टमीच्या महिनाभर अगोदरपासूनच हंडी कशी फोडावी, थर कसा रचावा, खांद्यावर पाय ठेवल्यानंतर तोल कसा जाऊ देऊ नये, थर कसा पेलावा याबाबत सराव करतात. या सरावासाठी १९९७ पासून त्यांच्या सोबत असलेल्या ८५ वर्षांच्या माई भोसले (ठाणे) ह्या त्यांना प्रशिक्षण देतात. मंडळातील ११९ तरुणी, महिलांना दहीहंडी फोडण्यासाठी त्या नुसत्या प्रशिक्षकच नव्हे तर त्या प्रोत्साहन वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.  महाराष्ट्राची दहीहंडीची संस्कृती केवळ महाराष्ट्रापुरतीच राहू नये म्हणून हे महिला मंडळाचे पथक विविध राज्यात जाऊन दहीहंडी फोडतात. दरम्यान, १९९७ पासून या महिला मंडळासोबत ८५ वर्षांच्या माई भोसले कार्यरत आहेत. वयस्कर असलेल्या या माईमुळे थर लावण्यासह त्यांना मार्गदर्शन करतात. या पथकाने आजपर्यंत परराज्यातही जाऊन दहीहंडी फोडली आहे. दहीहंडी फोडण्यासाठी सर्वच महिला असल्यामुळे त्यांची दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. आतापर्यंत या पथकाने ठाणे, घाटकोपर, कोल्हापूर, मुंबई, शिर्डी, नाशिकसह परराज्याबाहेरील  द्वारका, जयपूर, उज्जैन, अमृतसर, वाघा बॉर्डर, पंजाब, कर्नाटक तसेच दोन वर्षांपूर्वी वाघा बॉर्डरवरील देवळाली येथे सैनिकांबरोबर दहीहंडी साजरी केली.  येथे होणार कार्यक्रम : शनिवारी सायंकाळी ५ ते १० या वेळेत जवाहर बाग, बगडिया ग्रुप, बडी सडक,छत्रपती शिवाजी  महाराज पुतळा परिसर, गांधी चमन,नूतन वसाहत सह जालना शहरातील विविध चौकांमध्ये कार्यक्रम  होत आहे.

सोहळ्याचा लाभ घ्या 
जालना शहरात पहिल्यांदाच भारतातील पहिले महिलांचे गोविंदा पथक येत आहे. या पथकाच्या थराराचा जालनेकरांनी लाभ घ्यावा. आकर्षक विद्युत रोषणाई, लयबद्ध, बँडच्या तालावर होणाऱ्या या ऐतिहासिक नयनरम्य सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. 
-अर्जुन खोतकर, राज्यमंत्री, जालना.

जीवघेण्या स्पर्धेला आळा 
दहीहंडीच्या निमित्ताने जीवघेण्या होणाऱ्या स्पर्धेला आळा बसण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राची संस्कृती इतर राज्यात जाण्यासाठी कुठलेही मानधन न घेता पुढाकार घेत आहोत. राज्यमंत्री खोतकर यांच्या आवाहनानुसार या वर्षीची दहीहंडी जालन्यात होत आहे. -भाऊ कोरगावकर, अध्यक्ष महिला गोविंदा पथक, मुंबई.