Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | India's first Digital Village in Ghodpeth

चंद्रपुरातील घोडपेठ देशातील पहिले डिजिटल गाव; केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केले लोकार्पण, आर्थिक व्यवहार प्रशिक्षणही मिळणार 

प्रतिनिधी | Update - Feb 12, 2019, 08:48 AM IST

गावातील नागरिकांना सोमवारपासून टेलिमेडिसीन सेवा, विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाची सुरुवात.

 • India's first Digital Village in Ghodpeth

  नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येणाऱ्या घोडपेठ येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून आता घोडपेठ उदयास आले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एक डिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली.

  चंद्रपूर जिल्ह्यातील घोडपेठ गावातील नागरिकांना सोमवारपासून टेलिमेडिसीन सेवा, विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाची सुरुवात, महिलांना सॅनिटरी नॅपकिन तयार करणे व विकण्याची सुविधा आणि ऊर्जा वाचवणाऱ्या एलईडी बल्बच्या निर्माण केंद्राची सुरुवात करण्यात आली. याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीच्या डिजिटल दाखल्यांची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली. यासोबतच या गावांमध्ये आता आर्थिक व्यवहारासंदर्भातील प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. गावामध्ये सोलार स्ट्रीट लाइट लवकरच लावले जाणार आहेत.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रामीण भागाबद्दल विशेष कळवळा असून त्यातूनच डिजिटल गाव करण्याची संकल्पना पुढे आल्याचे अहिर यांनी सांगितले. देशात डिजिटल व्यवहार सुरू झाला पाहिजे. कुठलेही मध्यस्थ न ठेवता थेट संगणकाच्या माध्यमातून बँकेपासून तर आरोग्यापर्यंतच्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी डिजिटल ग्राम असल्याचे ते म्हणाले.

  मुलींना सॅनिटरी नॅपकिनचेही वाटप
  घोडपेठ गावांमधील सगळ्या नागरिकांचे बँक अकाउंट काढल्याबद्दल अहिर यांनी त्यांचे अभिनंदन केले. टेलिमेडिसीन या सेवेचा अधिक लाभ घेण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले. सोमवारी घोडपेठ येथून मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांची एका रुग्णाची थेट बोलणी झाली. त्यांच्यासाठी ऑनलाइन सुचवण्यात आलेल्या औषधोपचाराची 'डिजिटल प्रिस्क्रिप्शन' त्यांनी या वेळी गावकऱ्यांना दाखवली. यापुढे सर्वांनी आपल्या आरोग्याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून टेलिमेडिसीनद्वारे तपासणी करावी, असे आवाहनही केले. कार्यक्रमानंतर गावच्या सरपंच वैशाली उरकुडे यांनी गावातील मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटपही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीएससीचे राज्याचे प्रमुख वैभव देशपांडे यांनी केले.

Trending