आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या उदरातून जन्मली, आजीच्या गर्भाशयात वाढलेली मुलगी, कन्येच्या मातृत्वासाठी मातेचे स्वत्वामुळे कन्या जन्मली!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आपल्या नि:संतान कन्येला 'आईपणाचा अनुभव' घेता यावा यासाठी एका माउलीने आपल्या कन्येला स्वत:चे गर्भाशय दिले. त्या प्रत्यारोपित गर्भाशयातून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देशातील पहिल्या बाळाचा जन्म झाला. पुण्याच्या गॅलेक्झी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने प्रत्यारोपित गर्भाशयातून बाळाचा जन्म घडवण्यात यश मिळवले आहे. अशा प्रकारे जन्मलेले हे जगातील बारावे बाळ ठरले आहे. गॅलेक्झी रुग्णालयाचे संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या २० वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने ही किमया साध्य केली आहे. 

- मीनाक्षी यांच्या मातोश्री म्हणाल्या, 'मी अत्यानंदी आहे. आई म्हणून मुलीसाठी जे करणे शक्य होते ते केल्याची आणि त्याचे सार्थक झाल्याची भावना वाटते, असे त्या म्हणाल्या. 

 

- मीनाक्षी यांचे पती हितेश म्हणाले,' लग्नानंतर ८ वर्षांनी मी एका कन्येचा पिता झालो याचा आनंद वाटतो. आम्ही या काळात बाळासाठी खूप प्रयत्न केले. अनेक डॉक्टर, अनेक रुग्णालये व अन्य उपाय केले. त्याची अखेर या आनंदाच्या क्षणात झाली आहे. 

- मीनाक्षी म्हणाल्या, 'आईने गर्भाशयाचे दान दिल्यानेच हे शक्य झाले. केवळ आईच हे करू शकते. आज मी खूप आनंदात आहे. 

 

तीन गर्भपातांमुळे मातृत्व हिरावले, दीड वर्षापूर्वी आईच्या गर्भाशयाचे प्रत्यारोपण 
- 1 बडोद्याच्या मीनाक्षी वालंद (२८) यांचा लग्नानंतर ८ वर्षांत विविध कारणांनी तीनदा गर्भपात झाला. त्यानंतर गर्भाशय निकामी झाल्याने मातृत्वाची शक्यताही संपली. पण मीनाक्षी यांच्या मातोश्री सुशीलाबेन यांनी स्वत:चे गर्भाशय मुलीला देण्याचा निर्णय घेतला. 
- 3 बुधवारी रात्री गर्भाशयातील पाण्याची पातळी कमी होत असल्याचे तसेच आईचा रक्तदाब वाढल्याचे लक्षात येताच त्वरित सिझेरियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री १२ वाजून १२ मिनिटांनी ज्या गर्भाशयातून मीनाक्षी यांचा जन्म झाला त्याच गर्भाशयातून मीनाक्षी यांच्या बाळाचाही जन्म झाला. 
- 2 गॅलेक्झी रुग्णालयातच १७ मे २०१७ रोजी गर्भाशय प्रत्यारोपण झाले. ते व्यवस्थित कार्य करू लागल्यावर प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला गर्भ मार्च २०१८ मध्ये मीनाक्षी यांच्या प्रत्यारोपित गर्भाशयात सोडण्यात आला. गर्भाशयाने हा गर्भ स्वीकारला, तेव्हापासून मीनाक्षी यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. 

 

वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची घटना : डॉक्टर 
दीड वर्षाच्या प्रक्रियेनंतर प्रत्यारोपित गर्भाशयातून बाळाचा जन्म होणे ही वैद्यकीय विश्वातील महत्त्वाची घटना आहे. विशेष म्हणजे गर्भाशय काढणे, ते प्रत्यारोपित करणे या दोन्ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारा केल्या होत्या. - डॉ. शैलेश पुणतांबेकर, वैद्यकीय संचालक, गॅलेक्झी रुग्णालय 

 

जगभरात ११ बाळांचा जन्म 
नवजात कन्येचे वजन १४५० ग्रॅम असून बाळासह आईची प्रकृती उत्तम आहे. जगभरात अशा प्रकारचे २७ रुग्ण असून त्यातून ११ बाळांचा जन्म झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जन्मलेले कन्यारत्न हे प्रत्यारोपित गर्भाशयातून जन्मलेले बारावे बाळ ठरले आहे. तसेच ते देशातील असे पहिलेच बाळ ठरले आहे. 

बातम्या आणखी आहेत...