आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपुरात ३५ एकरांवर साकारतेय ९५ कोटी रुपयांचे देशातील पहिलेच जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सायन्स सेंटर आणि अत्याधुनिक बटरफ्लाय गार्डनची उभारणी
  • मत्स्यालयापासून बटरफ्लाय गार्डन, सायन्स सेंटर तयार, बग्गीतून हाेणार पर्यटकांची सफर
  • ताडोबाची सफर करणाऱ्या पर्यटकांसाठी अत्याधुनिक स्वरूपाच्या गार्डनची पर्वणी

एकनाथ पाठक 

चंद्रपूर - काेळसा खाणींची माेठी साधनसंपत्ती चंद्रपूर जिल्ह्याला लाभली आहे. निसर्गाच्या याच दैवी देणगीमुळे चंद्रपूरला देशाच्या नकाशावर माेठी आेळख आहे. याशिवाय हिरव्यागार वनराईने नटलेल्या ताडाेबासारख्या प्रसिद्ध अभयारण्यानेही आता चंद्रपूर जिल्ह्याला नवीन आेळख मिळवून दिली.  

जागतिक दर्जाच्या बाॅटनिकल गार्डनमुळे आता याच नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला जात आहे. चंद्रपूर शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावरील विसापूर गावानजीक जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारले जात आहे. तब्बल ९५ कोटींचे बजेट असलेल्या या गार्डनमध्ये अत्याधुनिक सुविधांच्या १० इमारती तयार करण्यात येणार आहेत. या बॉटनिकल गार्डनमध्ये अत्याधुनिक मत्स्यालय, सायन्स सेंटर, फुलपाखरू उद्यान, अॅक्वास्केपचा समावेश आहे.

ताडोबाच्या जंगलाची सफारी करणाऱ्या तमाम पर्यटकांसाठी ही बॉटनिकल गार्डन मोठी पर्वणी ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेले हे देशातील पहिलेच बॉटनिकल गार्डन ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूरनजीक ३५ एकरांवर हा भव्य प्रकल्प तयार होत आहे. येत्या मार्चपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

सायन्स सेंटर आणि अत्याधुनिक बटरफ्लाय गार्डनची उभारणी


अत्याधुनिक सुविधा असलेले सायन्स सेंटर तयार करण्यात येत आहे. यासाठी अंदाजे ४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याशिवाय  विविध जातींच्या बटरफ्लायचे दर्शन घडवणारे बटरफ्लाय गार्डनही तयार करण्यात आले आहे. यासाठी  फुलपाखरांच्या स्वरूपाची इमारत तयार केली आहे. लक्षवेधी प्रवेशद्वाराची भिंत; राजस्थानातून खास दगड


बॉटनिकल गार्डनच्या समोरील प्रवेश दरवाजा उभारलेली भिंतही पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरणारी आहे. जुन्या परंपरेतील संस्कृतीचा वारसा टिकून राहावा याच पद्धतीचे दर्शन या भिंतीवर होते. राजेशाही राजवाड्याप्रमाणे या भिंती तयार करण्यात आलेल्या आहेत. साडेतीन कोटी खर्च करून हे प्रवेशद्वार सजवण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी राजस्थानातून दगड आणले आहेत. याशिवाय हे प्रवेशद्वारही अधिक आकर्षित हाेण्यासाठी खास राजस्थानवरून कारागीर आणले आहेत. हेच कारागीर या ठिकाणी दगड तासून प्रवेशद्वाराला नवा लूक आणत आहेत. २० पेक्षा अधिक कारागीर अधिक मेहनतीचे काम करत आहेत.

 

दीड एकर; महाकाय जहाजावर कॅफेटेरिया; घाना देशाचे लाकूड


बाॅटनिकल गार्डनमध्ये घाना येथील लाकडापासून महाकाय जहाजावर तयार करण्यात आलेला कॅफेटेरिया  लक्षवेधी ठरणार आहे.  याच्यासमाेर अर्ध्या एकरावर पाण्याचा माेठा टँक बांधण्यात आला आहे. हा पाण्याने भरलेला असेल. यामुळे समुद्रातील जहाजातून प्रवास करण्याचा फील पर्यटकांना येईल.विविध जातींच्या फुलपाखरांचे उद्यान 


विसापूर परिसरातील गार्डनमध्ये आता पर्यटकांना विविध जातींच्या फुलपाखरांना जवळून पाहण्याची संधी आहे. यासाठी खास बटरफ्लाय गार्डन उभारले जात आहे. यामध्ये विविध जातींच्या फुलपाखरांचा समावेश असेल. साडेपाच कोटी रुपये खर्च करून हे उद्यान तयार केले जाणार आहे. 

प्रकल्पात बोन्साय गार्डन, कॅना गार्डन


या गार्डनमध्ये फुलांची निर्जलीकरण तंत्रप्रणाली विकसित करण्यात येणार आहे. याबाबतचे प्रशिक्षण या संस्थेच्या वतीने या ठिकाणी दिले जाईल.  परिसरात  सायकॅड हाऊस, हर्बेरियम बीज संग्रहालय, बोन्साय गार्डन, कॅना गार्डन तयार होत आहे. आदिवासी लोकांसाठी हा प्रोजेक्ट महत्त्वाचा मानला जाताे.

७० एकरांवर विदर्भातील दोन हजार प्रजातींची लागवड 


विदर्भातील जुन्या अनेक झाडांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात विदर्भासाठी ही सर्वात माेठी हानी ठरणार आहे.  हा धोका लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने या प्रजातींच्या संवर्धनासाठी  एक मोहीम हाती घेतली आहे. यातून बॉटनिकल गार्डनच्या परिसरातील ७० एकर जमिनीवर २ हजार ८०० विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे.  यासाठी खास अत्याधुनिक पद्धतीचे प्लँटेशन करण्यात आले.  यासाठी या सर्वच परिसरास पाण्यासाठी खास ड्रिप प्लँट आहे.

इलेक्ट्राॅनिक बग्गी  


बाॅटनिकल गार्डन पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि चाहत्यांसाठी खास बग्गीची व्यवस्था करण्यात आली आहे.बॅटरीवरच्या या इलेक्ट्राॅनिक बग्गीतूनच पर्यटकांना या परिसरात प्रवास करता येणार आहे. यातून त्यांना ३५ एकरांवरचा हा भव्य स्वरूपातील प्राेजेक्ट पाहता येईल. याशिवाय १२५ एकरांवर उभारण्यात आलेल्या पाण्याच्या छाेट्या बंधाऱ्यांपासून विदर्भातील जुन्या प्रजाती, विविध झाडांचे प्रकल्प पाहण्याची संधी पर्यटकांना या बग्गीतून मिळेल. बातम्या आणखी आहेत...