Home | International | China | India's joint military practice with Pakistan

पाकिस्तानसोबत भारताचा संयुक्त लष्करी सराव; चीनने केले स्वागत

वृत्तसंस्था | Update - Aug 29, 2018, 08:46 AM IST

शांघाय सहकार्य संघटनेच्या वतीने (एससीआे) आयोजित संयुक्त सैन्य सरावात भारत-पाकिस्तानचे लष्कर सहभागी झाले.

 • India's joint military practice with Pakistan

  चेबारकुल- शांघाय सहकार्य संघटनेच्या वतीने (एससीआे) आयोजित संयुक्त सैन्य सरावात भारत-पाकिस्तानचे लष्कर सहभागी झाले. भारताव्यतिरिक्त चीन, रशिया, कझाकस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तानचे सैन्य यात सहभागी झाले आहे. हा सराव बुधवारपर्यंत (२९ ऑगस्ट) चालणार आहे.


  एससीआेतने शांतता मोहिमेअंतर्गत यंदा पहिल्यांदाच संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले. त्यात दहशतवाद प्रतिबंधक लष्करी योजनांची देवाण-घेवाण यानिमित्ताने करण्यात आली. भारत-पाकिस्तानच्या सैन्याला दहशतवादाच्या िवरोधात लढण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्यासाठी हा सराव महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास चीनने व्यक्त केला आहे. एससीआेच्या मंचावर भारत-पाकिस्तानचे सैन्य सहभागी झाले. याचे चीनने स्वागत केले आहे. दक्षिण आशियात भारत-पाकिस्तानचे जागतिक शांतता, स्थैर्याच्या दृष्टीने महत्त्व आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले.

  दोन्ही देशांत विश्वासाचीदेखील देवाणघेवाण होईल, असे चुनयिंग यांनी म्हटले. लष्करी पातळीवर दोन्ही देश संयुक्त सरावात सहभागी झाले. आता उभय देशांनी द्विपक्षीय पातळीवर चर्चा तसेच सहकार्याला प्रोत्साहन द्यायला हवे. त्याचा फायदा प्रादेशिक शांततेसाठी होणार आहे.


  मोदीजी, हजारो पीडितांचा अपमान का करताय? : सुरजेवाला
  दहशतवाद्यांनी हजारो लोकांची हत्या केली आहे. पाक ही दहशतवाद्यांची भूमी आहे. अशा देशाच्या लष्करासोबत सराव करणे योग्य नाही. मोदीजी, हजारो पीडितांचा अपमान का करत आहात? असा प्रश्न काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी सोशल मीडियाद्वारे उपस्थित केला आहे.


  सिंधू जलवाटप वाटाघाटीसाठी भारतीय शिष्टमंडळ लाहोरमध्ये
  इस्लामाबाद : प्रदीप कुमार सक्सेना यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ मंगळवारी लाहोरमध्ये दाखल झाले. सिंधू जलवाटपासाठी दोन्ही देशांतील वादावर तोडगा काढण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची मानली जाते. पुढील दोन दिवस भारत-पाक यांच्यातील वाटाघाटी सुरू राहतील. पाकिस्तानला सध्या भीषण पाणीटंचाई भासू लागली आहे.


  गेल्या आठवड्यात सुरुवात
  गेल्या आठवड्यात बुधवारी (२२ ऑगस्ट) रोजी संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात झाली. त्याचा समारोप बुधवारी (२९ ऑगस्ट) होणार आहे. या सरावात विविध देशांचे सुमारे ३ हजारांवर सैनिक सहभागी झाले होते.


  पाणी ठरू शकते संयुक्त विकासाचे माध्यम : संयुक्त राष्ट्र
  संयुक्त राष्ट्राच्या उपसरचिटणीस अमिना मोहंमद म्हणाल्या, काही वाद असतानाही भारत-पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू जल वाटप करार झाला होता. तो अद्यापही कायम आहे. या कराराने नदी जल तंट्याच्या सोडवणुकीचा मार्ग दाखवला आहे, असे गौरवोदगार अमिना यांनी काढले. स्टॉकहोममधील एका उच्च स्तरीय बैठकीला त्या मार्गदर्शन करत होत्या. पाण्यावरून युद्ध करणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची घोडचूक ठरेल. सामंजस्य, सहकार्यातून पाणी तंट्यातून तोडगा काढू शकतो. याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. काही बाबतीत कूटनीतिची देखील गरज असते. शेजारी देशांनी पाण्याच्या स्त्रोतांबाबत सहकार्यावर झालेल्या लाभाची देखील त्यांना आठवण करून दिली जाऊ शकते, असे अमिना यांनी सांगितले.


  मध्यनंतर दक्षिणेचाही समावेश
  एससीआेमध्ये मध्य आशियातील देशांचा सहभाग होता. अलीकडेच भारत-पाकिस्तान या दक्षिण आशियातील महत्त्वाच्या देशांनाही समाविष्ट करण्यात आले आहे.

Trending