बॉक्सिंग / भारताचा पुुुरुष बाॅक्सर पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये

संगीताचा आनंद लुटून दूर केले दडपण : अमित 

दिव्य मराठी नेटवर्क

Sep 21,2019 09:50:00 AM IST

एकतिनबर्ग - भारताच्या सुपरस्टार बाॅक्सर अमित पंघालने शुक्रवारी बाॅॅक्सिंगच्या विश्वात एेतिसहासिक कामगिरीची नाेंद केली. त्याने जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे तब्बल ४५ वर्षांत या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठणारा अमित हा भारताचा पहिला पुरुष बाॅक्सर ठरला. या स्पर्धेचे आयाेजन गत ४५ वर्षांपासून सातत्याने केले जाते. मात्र, अद्याप भारताच्या एकाही बाॅक्सरला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली नव्हती. आता अमित पंघालने भारताकडून हा विक्रमाचा पल्ला गाठला. त्याने ५२ किलाे वजन गटाच्या उपांत्य सामन्यात शानदार विजय संपादन केला. यासह त्याने आता या स्पर्धेत गाेल्डन पंचच्या आशा पल्लवित केल्या आहेत. आज शनिवारी त्याच्यासमाेर फायनलमध्ये आॅलिम्पिक चॅम्पियन शाखाेबिदीन जाेइराेवचे आव्हान असेल. दुसरीकडे भारताच्या मनीष काैशिकला ६३ किलाे वजन गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताला पहिल्यांदाच या स्पर्धेत दाेन पदकांची कमाई करता आली.


२०१८ च्या एशियन गेम्समधील चॅम्पियन अमित पंघालने आता जागतिक स्पर्धेत काैतुकास्पद कामगिरीची नाेंद केली. त्याने दुसऱ्यांदा जागतिक स्पर्धेत सहभाग घेतला. मात्र, त्याला २०१७ मध्ये या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच धडक मारता आली हाेती. आता त्याने आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावताना जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.


संगीताचा आनंद लुटून दूर केले दडपण : अमित
भारताच्या अमित पंघालने उपांत्य सामन्यापूर्वी आपले आवडते गाणे एेकले. संगीताचा मनमुराद आनंद लुटून त्याने या लढतीसाठीचे दडपण दूर केले. त्यानंतर त्याने आपल्या शैलीदार खेळीच्या बळावर हा उपांत्य सामना जिंकला आणि फायनलमधील प्रवेश निश्चित केला, अशा शब्दांत अमितने फायनलमधील प्रवेशाचे गुपित सांगितले.


अमितला संगीताचे भारी वेड आहे. त्यामुळे सरावानंतरचा येणारा थकवा दूर करण्यासाठी ताे सातत्याने संगीताचा आनंद लुटताे. यादरम्यान गाणे एेकून आपला थकवा दूर करण्याला त्याची पहिली पसंती असते.


जागतिक स्पर्धेपूर्वीच अमित हा एकतिनबर्गमध्ये दाखल झाला हाेता. येथील वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेण्यासाठी ताे या ठिकाणी आला हाेता. येथील तापमान हे ८ ते १० डिग्री सेल्सियस असते.

X
COMMENT