आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India's Victory Over Sri Lanka; Now, Indian Will Face New Zealand In The Semi finals

भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय; आता उपांत्य सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार; ९ जुलै रोजी होणार लढत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीड्स - रोहित शर्मा (१०३), लोकेश राहुल (१११) व बुमराहच्या (३ बळी) शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने विश्वचषकात अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय मिळवला. आता भारताचा उपांत्य सामना न्यूझीलंडशी ९ जुलै रोजी होणार आहे. श्रीलंकेने ७ बाद २६४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने ४३.३ षटकांत ३ गडी गमावत २६५ धावा केल्या. रोहित शर्माने विश्वचषकात विक्रमी पाचवे शतक झळकावले. 
श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजचे (११३) हे वनडेतील तिसरे आणि विश्वचषकातील पहिले शतक ठरले. त्याने आपली तिन्ही शतके भारताविरुद्ध काढली. थिरिमानेनेदेखील ५३ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने ३७ धावा देत ३ विकेट घेतल्या.बुमराहने पहिले षटक निर्धाव टाकले आणि आपल्या दुसऱ्या षटकात करुणारत्नेला (१०) बाद केले. कुशल परेराला (१८), कुशल मेंडिस (३) अपयशी ठरले. अविष्का फर्नांडोला (२०) हार्दिक पांड्याने बाद केले. ५५ धावांवर ४ गडी गमावल्यानंतर आलेल्या मॅथ्यूज व थिरिमाने (५३) यांनी पाचव्या गड्यासाठी १२४ धावा काढल्या. मॅथ्यूजने धनंजया (२९*) सोबत सहाव्या गड्यासाठी ७४ धावा केल्या. ४० षटकांत संघाची धावसंख्या ५ बाद २०० धावा होती. संघाने अखेरच्या १० षटकांत ६४ धावा जोडल्या.

 

रोहितचे पाचवे शतक 

रोहित शर्माने चालू विश्वचषकात आपले पाचवे शतक झळकावले. एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. भारताच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी   पहिल्यांदा विश्वचषकात शतके ठाेकली.  यापूर्वी २०१५ मध्ये सर्वाधिक ४ शतके श्रीलंकेच्या संगकाराची होती.

 

बुमराहने केले १०० बळी पूर्ण 

बुमराहने आपल्या ५७ वनडे सामन्यांत १०० बळी पूर्ण केले. मात्र, तो सर्वात वेगाने १०० बळी घेणारा भारतीय बनू शकला नाही. हा विक्रम मोहमंद शमीच्या नावे आहे. शमीने ५६ सामन्यांत हा विक्रमी कामगिरी केली आहे. बुमराह १०० पेक्षा अधिक बळी घेणारा २१ वा भारतीय गोलंदाज बनला आहे. बुमराहचे आता वनडेमध्ये एकूण १०२ बळी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...