आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे, राजकारणात कधीच उतरणार नाही', निवृत्ती महाराज इंदुरीकरांचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भाजपच्या व्यासपीठावर गेलो, तो सामाजिक कार्यक्रमासाठी आणि धनादेश सुपूर्द करण्यासाठी, समाजसेवेचे व्रत हाती घेतले असल्यामुळे, कधीही राजकारणात येणार नाही, अशी प्रतिक्रीया निवृत्ती महाराजांनी दिली. स्वतः एका पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला.



महाराजांचे स्पष्टीकरण

राम कृष्ण हरी..

"आज संगमनेर तालुक्यातील महाजनादेश यात्रेमध्ये मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी गेलो नव्हतो. समाजासाठी माझं काहीतरी देणं लागते आणि माझ्या व्यस्त कार्यक्रमांच्या दैनंदिन जीवनात मला समाजासाठी जी काही मदत करायची असती ती करता येत नाही. म्हणून आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यासाठी संगमनेर गेलो होतो. मी कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू मनामध्ये ठेवलेला नव्हता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी तो एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला व कुठल्याही पक्षाची मफर गळ्यात न घालता तिथून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निघून गेलो.

जर मला राजकारणात किंवा निवडणुकीत उतरायचे असते तर मी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तिथेच थांबून राहिलो असतो परंतु मी मात्र समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. राजकारणात मी कधीही येणार नाही आणि संगमनेर तालुक्याचे नेतृत्व देखील खूप सुसंस्कृत आणि विकासात्मक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी मी स्वतः समाजासाठी करत आलो आहे. माझ्या स्वतःच्या शाळेसाठी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनीच पहिली वर्गणी दिलेली आहे आणि आज देखील आमदार बाळासाहेब थोरात हे शाळेला नेहमी मदत करत आहे. मी कधीही या गोष्टीचा विसर पडू देणार नाही.मी सर्व माझ्या हितचिंतकांना व व श्रोत्यांना सांगू इच्छितो की मी कधीही राजकारणात येणार नाही. समाजकार्याचा वसा मी हाती घेतलेला आहे तो माझ्याकडून चिरंतर सुरू राहील. त्यामुळे माझ्या संगमनेर विधानसभा उमेदवारीच्या काही बातम्या सुरू आहेत त्यांना मी आजच जाग्यावर पूर्णविराम देतो आहे." अशी प्रतिक्रीया इंदुरीकर महाराजांनी दिली.




भाजपच्या महाजनादेश यात्रेदरम्यान, काल अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर इंदुरीकर महाराजदेखील उपस्थित होते.  यावेळी इंदुरीकर महाराजांनी व्यासपीठावरच मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली. त्यामुळे महाराज निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, पण आता त्यांच्या या प्रतिक्रीयेनंतर त्यांच्या प्रवेशाच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...