आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Industry Will Not Come If The City Remains Unsettled; Says CM Devendra Fadnavis Warns Aurangabd

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहर अशांत राहिले तर उद्योग येणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औद्योगिक गुंतवणुकीसाठीच्या अजेंड्यात औरंगाबाद टॉपवर आहे. मात्र या ना त्या कारणाने शहर सतत अशांत आहे. ते असेच अशांत राहिले तर विदेशी कंपन्या गुंतवणूक करणार नाहीत, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (३ जानेवारी) दिला. १०० कोटी रस्ते कामांचे भूमिपूजन टीव्ही सेंटर चौकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. याच वेळी सिडकोतील नागरिकांना मालकी हक्क दिल्याबद्दल जाहीर सभाही झाली त्यात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, येथील लोकांना विकासच हवा आहे. पण शहर अशांत असेल तर त्याचा विपरीत परिणाम होतो हे लक्षात ठेवा. 

 

औरंगाबादेत डीएमआयसीच्या रूपाने मोठी उद्योगनगरी उभी राहत आहे. पण जेथे कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहत नाही, जेथे दंगली होतात, लोक मारामाऱ्या करतात अशा ठिकाणी विदेशी कंपन्या येत नाहीत. कारण उद्योजक आधी कायदा सुव्यवस्थेची चौकशी करतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

 

इलेक्ट्रिक बस घ्या, फरकाचीही रक्कम देतो : 
पुण्यात साध्या दरातच एसी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येत आहेत. औरंगाबादनेही तसा प्रयत्न करावा. यासाठी स्मार्ट सिटीतून उपलब्ध होणारा निधी आणि बसची रक्कम या तफावतीतील रक्कम राज्य शासन देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

आकांक्षा देशमुखला न्याय द्या: 
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच एमजीएममध्ये खून झालेल्या आकांक्षा देशमुखला न्याय द्या, अशी जोरजोरात मागणी करत काही तरुणांनी तिचे छायाचित्र असलेले फलक उंचावले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही इथे गोंधळ घालाल तर मी कडक कारवाई करीन. त्यानंतर पोलिसांनी मुलांना शांत करत फलक ताब्यात घेतले. 

 

यांची होती उपस्थिती : 
शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, सुभाष झांबड, इम्तियाज जलील, नारायण कुचे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर आदी. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. 

 

समांतर जलवाहिनी योजना पूर्ण केली तरच औरंगाबादकरांच्या प्रेमाला पात्र ठरेन 
कार्यक्रमाचे नियोजन नसल्याने भूमिपूजन कोनशिलेपर्यंत पोहोचणे आणि तिथून व्यासपीठावर जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अक्षरश: गर्दीतून वाट काढावी लागली.

 

'समांतर' लवकर मार्ग काढा 
औरंगाबाद शहरातील नागरिकांनी आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे. आपण त्यांच्या प्रेमाची उतराई करू शकत नाही, परंतु समांतर जलवाहिनीचा प्रकल्प पूर्ण करू शकलो तर त्यांच्या प्रेमाला पात्र ठरू, असे सांगतानाच कोर्ट कचेऱ्यातून तातडीने मार्ग काढावा, त्यासाठी नंतर लागेल तेवढा निधी राज्य सरकार देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयएमने या प्रकल्पाला प्रारंभीपासून विरोध केला आहे. त्यांचा नामोल्लेख न करता यात राजकारण आणू नये. प्रॅक्टिकल विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. महापालिकेने शहराला पाणी देण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे, पैशाची कमी पडणार नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. 
मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे अपेक्षेप्रमाणे टी.व्ही. सेंटर चौकापासून ते थेट जळगाव रोडपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. 

 

फ्री होल्ड म्हणजे १०० टक्के मालकीच 
फ्री होल्ड म्हणजे १०० टक्के मालकी नाही, असा समज असल्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केल्याने फडणवीस यांनी यावर खुलासा केला. ते म्हणाले फ्री होल्ड म्हणजे १०० टक्के मालकी आहे. येथील लोकांना सिडको किंवा म्हाडाकडे कशासाठीही जावे लागणार नाही. घराची विक्री, युजर चेंज, गहाण ठेवणे, फेरफार हे आता परस्पर करता येऊ शकेल. त्यामुळे ही १०० टक्के मालकी आहे. नागरिकांनी निश्चिंत राहावे. 

 

शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी निधी देणार 
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी २ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी महापौर घोडेले यांनी केली. तेव्हा मनपाने प्रस्ताव पाठवताच १५ दिवसांत निधी दिला जाईल. शिवरायांना अपेक्षित असलेले सर्वांना सोबत घेऊन रयतेचे राज्य चालवूयात, असे सांगताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी, मुंडेंच्या स्मारकांसाठीही पैसा कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

 

महिला पोलिस अधिकारी पडल्या; छायाचित्रकारांना मारहाण.. 
आधीच वर्दळीचा चौक, त्यात भाजप पदाधिकारी, पोलिसांकडून काहीही नियोजन नसल्याने पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आला. मंचावर सर्वच नगरसेवक अन् इतर लोक घुसले. गर्दी नियंत्रित करताना पोलिस उपायुक्त दीपाली घाडगे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी मंचावरून खाली पडल्या. छायाचित्रकारांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात काही जणांचे कॅमेरे फुटले.