आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलिस ठाण्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरी येथील ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना. मारेगावचे पोलिस निरीक्षक वडगावकर यांच्या आदेशानुसार पोलिस हवालदार मधुकर निळकंठ मुके (वय ५२) , हवालदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे (वय ४८) , पोलिस शिपाई प्रमोद फुफरे (वय ३१) , पोलिस वाहन चालक राहुल बोंडे (वय ३२), पोलिस नाईक निलेश वाढई (वय ३५) सर्व पोलिस वाहन (एम.एच. ३७ ए ४२४६) ने अजामीनपात्र वारंट घेऊन आरोपी अनिल लेतू मेश्राम (वय ३५) याला ताब्यात घेण्याकरीता आरोपीच्या घरी सोमवारी रात्री एक वाजताच्या सुमारास गेले.
सदर पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीला आवाज देऊन पोलिस असल्याचे सांगितले. तुझ्यावर अटक वारंट आहे. म्हणून पोलिस ठाण्यात सोबत येण्यास सांगितले. तेव्हा मी येत नाही. तुम्ही माझे काय करता ते मी पाहून घेतो. मला हात लावून दाखवा, असे म्हणत आरोपी आणि त्याची आई इंदिरा मेश्राम यांनी लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला चढवला.
अचानक झालेल्या हल्याने पोलिस घाबरून गेले. यात जमादार राजेंद्र कुळमेथे यांच्या डोक्याला, हाताला आणि तोंडाला गंभीर मार लागल्याने ते खाली कोसळले. पोलिसांनी स्वरक्षणासाठी हल्ला रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोपीच्या आक्रमकतेपुढे पोलिस हतबल झाले. यावेळी पोलिस हवालदार मधुकर मुके, पोलिस शिपाई प्रमोद फुफरे या हल्यात गंभीर जखमी झाले.
आरोपीच्या आक्रमक भूमिकेमुळे घाबरून पोलिसांनी मोठ- मोठ्याने आवाज देत गावातील लोकांना मदतीला बोलविले. मात्र आरोपी अंधारात पळून गेला. यावेळी गावातील गुणवंत देरकर आणि सहकारी मदतीला धावून आले. गंभीर जखमी राजेंद्र कुळमेथे यांना घेऊन पोलिस माघारी मारेगावला आले.
राजेंद्र कुळमेथेसह सर्व जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी कुळमेथे यांना मृत घोषित केले. तर मधुकर मुके, प्रमोद फुफरे यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची फिर्याद हवालदार मधुकर मुके यांनी मारेगाव पोलिसात दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.