आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
राम मंदिराच्या उभारणीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मंदिर उभारण्यासाठी देशभर आंदोलने उभारून, सभा आयोजित करून सरकारवर दबाव आणला जात आहे. नागपुरात 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या हुंकार सभेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी सांगितले, संसदेत कायदा करून ज्याप्रमाणे सोमनाथ मंदिर बांधण्यात आले त्याचप्रमाणे कायदा करून वा अध्यादेश काढून अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी नागपुरातील क्रीडा चौक, हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेला साध्वी ऋतंभरा, ज्योतिषपीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज, देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विहिंपचे केंद्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सभेसाठी 60 बाय 80 एवढे भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार असून मैदानात आणि मैदानाबाहेरही एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.’ दरम्यान, ‘सभेच्या वातावरणनिर्मितीसाठी संपूर्ण विदर्भात सुमारे शंभर ते दीडशे बैठका घेण्यात आल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेला संपूर्ण विदर्भातून एक लाख कार्यकर्ते येतील,’ असा विश्वास विहिंपचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष राजेश्वर निवल यांनी व्यक्त केला.
काही लोक राम मंदिराला तीव्र विरोध करीत आहेत. पण आता हिंदू समाज आणखी वाट पाहण्याच्या मानसिकतेत नाही. न्यायालयाकडून करण्यात येत असलेल्या उपेक्षेमुळे या प्रकरणी त्वरित निर्णय होत नसल्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे भेंडे यांनी सांगितले. न्यायालयानेही या प्रकरणी दैनंदिन सुनावणी सुरू करावी, अशी िवनंती त्यांनी केली. सभेला रामभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सभेचे व्यवस्था प्रमुख अजय निलदावार आदींनी केले आहे.
याचिकाकर्त्याचा आक्षेप
याचिकाकर्ते जनार्दन मून यांच्या मते, नागपुरातील सभा ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. राजकीय कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या मैदानाचा वापर करता येत नाही. त्यासाठी विद्यापीठाची परवानगीदेखील घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या सभेला परवानगी नाकारावी यासाठी नागपूर पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. सभा आयोजित करून इतर वर्गांच्या मूलभूत अधिकारांना धक्का पोहोचवण्याचे काम ही मंडळी करीत असल्याचा दावाही याचिकाकर्त्याने केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.