Home | Maharashtra | Pune | Atharvashirsha recital at Dagdusheth Halwai Ganapati Mandal Pune

‘दगडूशेठ’समाेर सामूहिक अथर्वशीर्ष पठणात ३० विदेशी पाहुण्यांसह २५ हजारांवर महिला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 15, 2018, 07:01 AM IST

शुक्रवारी पहाटे चार वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात यंदा 25 हजारहून अधिक महिला भाविकांनी सहभाग घेतला हाेता.

 • Atharvashirsha recital at Dagdusheth Halwai Ganapati Mandal Pune

  पुणे- ओम् नमस्ते गणपतये... गजानना, गजानना...ओम गं गणपतये नम:...मोरया, मोरया...च्या जयघोषाने तब्बल २५ हजारापेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमाेर अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. पारंपरिक वेशात शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात अथर्वशीर्ष पठणासोबत महाआरती झाली आणि इंधन वाचवाचा संदेश देत महिलांनी सामाजिक संदेश दिला.


  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी फिनोलेक्सच्या रितू छाब्रिया, वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, पं.वसंतराव गाडगीळ, एमएनजीएलचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, उल्हास भट, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, अभिजित कोद्रे, मंगेश सूर्यवंशी, यतिश रासने, राजेश सांकला यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.


  हिंदवी जगताप, मेधा लांडगे, गायत्री वायचळ, मोती माला यांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला सुरुवात झाली. स्वाती नखाते यांच्यासोबत सर्व महिलांनी तीन वेळा ओंकार म्हटला. मानसी प्रभुणे, सायली ताटे, प्रतिभा फडणीस, हेमलता डाबी, अंजली आबादे यांच्यासोबत महिलांनी अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. तर, मयूरी कुलकर्णी, हेमा कुलकर्णी, उत्कर्षा काळे, भाग्यश्री ठकार यांनी घोषामध्ये सहभाग घेतला. त्यांना राजन घाणेकर आणि साधना पोफळे यांनी तबला पेटीची साथसंगत केली. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरिता गर्दी केली. भक्तिरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३२ वे वर्ष होते. एमएनजीएलच्या माध्यमातून हातात झेंडे घेऊन महिलांनी इंधन वाचवाचा देखील संदेश दिला.


  परदेशी पर्यटकांची पठणासाठी उपस्थिती
  पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला सहवास संस्थेशी निगडित असलेल्या फ्रान्स, इस्रायल, इटली, मॅक्सिकाे, पोलंड, तुर्कीसह विविध देशांतील ३० हून अधिक परदेशी पर्यटकांनी पठणाकरिता हजेरी लावली. सतीश देसाई यांनी परदेशी पाहुण्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यास सहकार्य केले.

Trending