Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Avani tiger cubs captures in yavatmal Pandharkavada

अवनीच्या मादी बछड्याला पांढरकवड्याच्या जंगलात पकडण्यात यश, नागपुरच्या पेंच प्रकल्पात रवानगी

प्रतिनिधी | Update - Dec 23, 2018, 10:11 AM IST

पांढरकवडा वन परिसरातील अंजी भागात सुमारे 80 एकर परिसराला तारेचे कुंपण तयार करून त्यावर पांढऱ्या रंगाचे कापड लावले आहे.

  • Avani tiger cubs captures in yavatmal Pandharkavada

    यवतमाळ - अवनी वाघिणीच्या २ पैकी एका मादी बछड्याला पकडण्यात वन विभागाच्या पथकाला अखेर यश आले. शनिवारी दुपारी ३.३० वाजता पांढरकवडा वन परिसरातील अंजी जंगल क्षेत्रात सेक्टर ६५५ मध्ये पथकाने बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. तातडीने त्याला नागपूरच्या पेंच प्रकल्पात पाठवण्यात आले. या शोधमोहिमेसाठी ८० एकर परिसराला तारेचे कुंपण तयार करून त्यावर पांढऱ्या रंगाचे कापड लावले होते. चार हत्तींसह २५० वर वन विभाग कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा फौजफाटा माेहिमेत सहभागी झाला होता.


    यवतमाळमध्ये १३ जणांना ठार करणाऱ्या वाघिणीला २ नोव्हेंबरला टिपण्यात आलेे होते. त्यानंतर तिच्या २ बछड्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. बछडे शिकारीस सक्षम असल्याने त्यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरू झाल्या. बछड्यांना सी-१ (नर) व सी -२ (मादी) अशी नावे देण्यात आली. त्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पांढरकवडा वन परिसरात सुमारे ८० एकर परिसराला तारेचे कुंपण तयार केले. त्यांना बेशुद्ध करून जेरबंद करण्यास मदत व्हावी म्हणून मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्यातील ४ हत्तींना पाचारण करण्यात आले. या हत्तींवर बसून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक बछड्यांचा शोध घेत होते. मोहिमेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाइल जमा करून घेतले होते. अवनी प्रकरणातील बहुतांशी घडामोडी शनिवारीच घडल्या. अवनीने ठार केलेल्या १३ लोकांपैकी बहुतांशी शिकारी या शनिवारी केल्या होत्या. शनिवारीच बछड्यालाही पकडण्यात आले.


    दुसऱ्या प्रयत्नात अचूक वेध
    शनिवारी बछडे पथकाच्या टप्प्यात आले. त्यापैकी एकाला दुपारी २.५० वाजेच्या सुमारास डार्ट मारण्यात आला. मात्र यश मिळाले नाही. दुपारी ३.१५ वाजता पुन्हा डार्ट मारला. त्याने बछडा बेशुद्ध झाला. नियमानुसार तपासणी करून त्याची रवानगी पेंच प्रकल्पात करण्यात आली. दुसरा बछडा मात्र पळून गेला. तो बछडाही पथकाच्या टप्प्यात आहे.

Trending