आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टीतील मुलांचे कर्तृत्व चित्रपटात, अमिताभ नागपुरात करणार चित्रीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागराज मंजुळे दिग्दर्शित "झुंड' या चित्रपटाचे शूटिंग नागपुरात होणार असून साक्षात अमिताभ बच्चन नोव्हेंबरमध्ये सलग दीड महिना नागपुरात चित्रीकरणासाठी येणार आहेत. मध्यंतरी बारगळलेल्या "झुंड'ची गाडी आता रुळांवर आली असून अमिताभ बच्चननेही चित्रपटासाठी तारखा दिल्याने चित्रपट पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात नागराज मंजुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चित्रपटाचे शूटिंग नागपुरात होणार असून त्यासाठी अमिताभ बच्चन येणार असल्याचे सांगितले. 


"झुंड'च्या मार्गात प्रारंभी अनेक अडथळे आले. सुरुवातीला अमिताभ बच्चनला कथा न आवडल्यामुळे त्याने त्यात काही बदल सुचवले. त्यानंतर नागराज मंजुळे यांनी पुणे विद्यापीठाच्या आवारात "झुंड'चा सेट लावला. परंतु त्यासाठी परवानगी न घेतल्यावरून गदारोळ झाल्यानंतर हा सेट तोडावा लागला. त्यानंतर या चित्रपटाबद्दल काहीच हालचाल झाली नाही. आता चित्रपटाचे शूटिंग नागपुरात होणार असून अमिताभ बच्चन सलग चित्रीकरण करणार असल्याचे मंजुळे यांनी दिव्य मराठीला सांगितले. 


झुंड चित्रपटाचे नेमके कथानक काय असणार 
समाजाने नाकारलेल्या आणि त्यामुळेच वाममार्गाला जाण्याची शक्यता असलेल्या झोपडपट्टीतील मुलामुलींत विजय बारसे यांनी फुटबाॅल खेळाचे प्रेम रुजवले. त्यातूनच "स्लमसाॅकर' नावाचा उपक्रम जन्माला घातला. बारसेंनी घडवलेल्या या फुटबाॅलपटूंनी परदेशात होणाऱ्या हाेमलेस फुटबाॅल वर्ल्डकप स्पर्धेतही जबरदस्त चमक दाखवली. बारसे यांचा संघर्ष व झोपडपट्टी फुटबाॅलचा रंजक, चित्तथरारक प्रवास "झुंड'मध्ये दाखवण्यात आला आहे. उपेक्षित मुलांच्या जीवनात विजय स्टिफन बारसे यांनी जगण्याची नवी उमेद जागवली...ती जाणीवपूर्वक रुजवली...झोपडपट्टी फुटबाॅलच्या राेपट्याचा आता वड झालाय...या वडाच्या पारंब्यांचाही वड होऊन एक अख्खे वडाचे बनच तयार झालेय. 

 

बातम्या आणखी आहेत...