आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप प्रदेश कार्यकारिणीची उद्यापासून दोनदिवसीय बैठक; युती आणि निवडणुकीबाबत होणार चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादीने 2019 च्या निवडणुकीच्या तयारीसाठी बैठकांचे सत्र सुरू केले असतानाच आता भाजपही बैठका घेण्यास सुरुवात करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार आणि गुरुवारी दादरमधील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे उपस्थित राहाणार आहेत. आगामी निवडणुका आणि शिवसेनेसोबत युतीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.   

 

सूत्रांच्या मते, भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर काय होऊ शकते, याचा एक आढावा घेतला असून त्यावर बैठकीत चर्चा होईल. स्वबळावर किती जागा येतील, युती केल्यास किती फायदा होईल तसेच भाजपने चार वर्षांत केलेली कामे, अंतर्गत सर्वेक्षण शिवसेनेसोबत युती करण्यासाठी मन वळवण्यासाठीही प्रयत्न करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होईल. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीच्या बाजूने आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना-भाजप वेगळे लढले तर दोघांचेही नुकसान होईल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे युतीबाबत सखोल चर्चा या बैठकीत केली जाईल.   
 
काँग्रेस-राष्ट्रवादीचीही बैठक   
बैठकांचा धडाका लावलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीनेही बुधवारी एका बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या माजी मंत्र्याने "दिव्य मराठी'शी बोलताना दिली. प्रकाश आंबेडकर यांच्यासह आघाडीत जे पक्ष येतील त्यांना कोणत्या आणि कशा जागा दिल्या जाऊ शकतील, त्यात काँग्रेसचा वाटा किती आणि राष्ट्रवादीचा किती यावरही प्राथमिक चर्चा होईल, असेही या नेत्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...