आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींच्या गावांतच भाजपचा पराभव; धापेवाडा आणि दत्तक गावात काँग्रेस पुरस्कृत सरपंच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायतींमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपही मोठ्या यशाचे दावे करत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा आणि दत्तक गाव पाचगावात त्यांना जोरदार धक्का बसला आहे. या दोन्ही गावांत भाजपचा धुव्वा उडाला असून सरपंचपदांवर काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी बाजी मारली. 


नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायतींच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. या निवडणुकांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने २०० पेक्षा जास्त सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. तर भाजपने २१८ ग्राम पंचायतींत बाजी मारल्याचा दावा केला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा गावात भाजपला केवळ सदस्य निवडून आणता आला. येथील सरपंच पदाच्या लढतीत काँग्रेस पुरस्कृत सुरेश डोंगरे यांनी भाजप पुरस्कृत संजय शेंडेंचा पराभव केला. येथे भाजपमध्ये जोरदार गटबाजी होती. सरपंच पदासाठी दोन दावेदार होते. त्यामुळे मतविभाजनाचा फटका बसला, असा दावा नागपूर ग्रामीण भाजपचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केला आहे. तर पाचगावात भाजपला १४ पैकी केवळ ४ जागांवर विजय मिळवता आहे. तेथेही काँग्रेसच्या उषा ठाकरे यांनी भाजपसमर्थित रजनी लोणारेंचा पराभव केला. लोणारेंना भाजपमधील ४ बंडखोर महिलांनी आव्हान दिले होते. 


दावा केलेल्या सरपंचांची यादी जाहीर करा: काँग्रेस 
काँग्रेसचे नागपूर ग्रामीण अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने २०० पेक्षा जास्त ग्राम पंचायतींत आपले सरपंच निवडून आणल्याचा दावा केला आहे. दरम्यान, निवडून आल्याचा दावा ठोकलेल्या सरपंचांची यादी जाहीर करण्याचे त्यांनी आव्हान भाजपला दिले आहे. गडकरींना दोन्ही गावांत मतदारांनी नाकारले, याचा उल्लेख करताना ग्रामीण भागातील असंतोष लपविण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचा आरोपही मुळक यांनी केला. गतवर्षी मुख्यमंत्री फडणवीसांचे दत्तक गाव फेटरी आणि उर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुरादेवी गावातही भाजपला पराभवाचा धक्का बसला होता. 

बातम्या आणखी आहेत...