आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्ययात्रा नेत असताना 15 फूट उंच लाेखंडी पूल काेसळला; 13 जखमी; जळगावच्या ममुराबादेतील लेंडी नाल्यावरील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील ममुराबाद नाका परिसरातील लेंडी नाल्यावरील १५ फूट उंच लोखंडी पुलावरून अंत्ययात्रा जात असताना अचानक हा पूल कोसळला. यात १३ नागरिक थेट नाल्यात पडल्याने जखमी झाले. सोमवारी दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली. खांद्यावरील मृतदेहसुद्धा या वेळी नाल्यात पडला. चिखलाने माखलेल्या नागरिकांनी शेजारील हातपंपावर अंघाेळ करून दफनविधी पार पाडला.

 

शनिपेठेत राहणारे नारायण हरी घुगरे (५४) यांचे रविवारी निधन झाले. सोमवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा ममुराबाद नाक्यावरील लिंगायत गवळी समाजाच्या दफनभूमीत येत होती. या वेळी अंत्ययात्रा जात असताना अचानक पूल कोसळला. नारायण घुगरे यांचा मृतदेह पकडलेल्यांसह अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक थेट नाल्यात कोसळले. यात नारायण नंदू गवळी (चाळीसगाव) यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात अाले. 


नाल्यात कोसळल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक घाण, चिखलाने माखले होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. घटनेनंतर चिखलाने माखलेल्या नागरिकांनी जवळच असलेल्या हातपंपावर अंघोळ केल्यानंतर पुढे दफनविधी आटोपण्यात आला. या अंत्ययात्रेत महिलांचाही सहभाग होता. सुदैवाने महिला जखमी झाल्या नाहीत.  

 

अशी होती पुलाची अवस्था : लेंडी नाल्यावर या पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी अँगल व पायी चालण्याच्या जागेवर सिमेंटचे कल्व्हर्ट तयार केलेले होते. नाल्याच्या मध्यभागी आधार नसल्याने काही महिन्यांपासून हा पूल कमकुवत झाला होता. पूल कोसळल्यानंतर सुदैवाने कोणीही पुलाखाली दबला गेला नाही. पूल कोसळला त्या ठिकाणी सिमेंटचा बेस असल्यामुळे नागरिकांना उभे राहता अाले. पूल खाली कोसळण्याऐवजी आजूबाजूला पडला असता तर लोक दलदलीत अडकण्याची भीती होती.

बातम्या आणखी आहेत...