आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्गारच्या प्रेरणेतूनच वाढला काेरेगाव भीमा चा हिंसाचार: पाच हजार १६० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ राेजी पार पडलेल्या एल्गार परिषदेच्या चार ते पाच महिने अाधी सुरू असलेली पूर्वतयारी व एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे काेरेगाव भीमा येथे एक जानेवारी २०१८ राेजी हिंसाचाराची व्याप्ती वाढली, असे पुणे पाेलिसांनी गुरुवारी विशेष न्यायाधीश किशाेर वढणे यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या दाेषाराेपपत्रात नमूद केले अाहे.

 

पुणे पाेलिसांच्या वतीने सुधीर ढवळे, राेना विल्सन, शाेमा सेन, महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग हे अटक करण्यात अालेले पाच जण व भूमिगत असलेले काॅ. एम. ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बाेस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गाेस्वामी, काॅ. दिपू, काॅ. मंगलू यांच्याविराेधात पाच हजार १६० पानी दाेषाराेपत्र न्यायालयात दाखल केले. तसेच यासाेबत ८० साक्षीदारांचे जबाब नाेंदवून न्यायालयात तपास अधिकारी सहायक पाेलिस अायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी सादर केले.    

 

याप्रकरणी अाराेपींवर पाेलिसांनी भादंवि कलम १५२ (अ), ५०५ (१) (ब), १२० (१), १२१ (अ), १२४ (अ),३४, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा १९६७ सुधारित अधिनियम २०१२ कलम १३, १६,१७,१८ (ब), २०, ३८, ३९, ४० ही कलमे लावण्यात अाली अाहेत. तपास अधिकारी शिवाजी पवार म्हणाले, या प्रकरणातील पाच अाराेपींना सहा जून २०१८ राेजी सुरुवातीला अटक करण्यात अाली. सीपीअाय माअाेवादी या बंदी घालण्यात अालेल्या संघटनेच्या माध्यमातून एल्गार परिषदेचे अायाेजन, कार्यक्रमाचा प्रचार, अार्थिक निधीची मदत, प्रेरणा, दिशादर्शन अाराेपींनी भूमिगत असलेल्या माअाेवादी नेत्यांसाेबत अायाेजित करून त्याची अंमलबजावणी केली हाेती.

 

एल्गार परिषदेच्या अनुषंगाने काेरेगाव भीमा शाैर्य प्रेरणा दिन अायाेजित करण्यात अाला हाेता. त्यानंतर काेरेगाव भीमा या ठिकाणी दुसऱ्या दिवशी हिंसाचाराची दाहकता वाढली.छत्तीसगडमध्ये शरण अालेला गडचिराेलीतील वरिष्ठ माअाेवादी नेता पहाडसिंग याचादेखील पाेलिसांनी जबाब नाेंदवला. त्यामध्ये त्याने भूमिगत नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे हा देशभरातील शहरी माअाेवादाचे नेटवर्क जाळे सांभाळत अाहे. तसेच दलित संघटनांना चळवळीत सहभागी हाेण्यासाठी प्रेरित करताे, असे त्याने सांगितले अाहे.     

बातम्या आणखी आहेत...