आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्षांना मंत्रिदर्जा; माथाडी कामगारांना 5000 घरे देणार : मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- ‘मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, व्यवसाय, रोजगार यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या समाजातील तरुणांनी केवळ नोकऱ्या मागू नयेत तर नोकऱ्या देणारे बनावे यासाठी आम्ही अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्याला अनुरूप कालबद्ध कार्यक्रम तयार करीत आहोत,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. तसेच माथाडी कामगारांसाठी नवी मुंबईत दोन टप्प्यात 5 हजार घरे आरक्षित ठेवण्यात येतील,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.  


अण्णासाहेब पाटील यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील तसेच उपाध्यक्ष संजय पवार यांच्या पदांना अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा देत असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पणन मंत्री सुभाष देशमुख, आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.  
 
मुख्यमंत्री म्हणाले, ‘काही वर्षे निष्क्रिय असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी रुपये देऊन आम्ही पुनरुज्जीवित केले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून 10 लाखांपर्यंत कर्ज उद्योग-व्यवसाय-स्वयंरोजगारासाठी आम्ही विनातारण देत आहोत. शासन अशा कर्जांसाठी तारण म्हणून हमी देत आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेद्वारे गरीब आणि बहुजन समाजाच्या मुलांची उच्च शिक्षण घेण्यासाठी असलेली फीस शासन भरीत आहे. गेल्या वर्षी 600 कोटींची प्रतिपूर्ती शासनाने केली. लाखो मुलांना फायदा मिळाला. पैशाअभावी, निवास व्यवस्था नसल्याने शिक्षण घेणे थांबू नये म्हणून आम्ही वसतिगृहे उपलब्ध करून दिली असून 4 ते 5 जिल्ह्यांत ती सुरु झाली आहेत.’

बातम्या आणखी आहेत...