जालन्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर / जालन्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार..मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत गोंधळ, 3 जखमी

प्रतिनिधी

Nov 04,2018 07:42:00 AM IST

जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. या वेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात एका जिल्हा परिषद सदस्यांसह तालुकाध्यक्ष असे तिघे जण किरकोळ जखमी झाले अाहेत.
शनिवारी दुपारी ११.५५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरद्वारे पोलिस मैदानावर आगमन झाले. तेथून मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दाखल झाले. मुख्यमंत्री येण्याच्या १० मिनिटे अगोदर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपेंसोबत हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र आमदार टोपे हेलिपॅडवर गेल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच थांबले. दरम्यान आमदार टोपे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आत जाऊ देण्याची पोलिसांकडे विनंती केली. पोलिसांनी त्यांना थांबवल्याने सर्व कार्यकर्ते गेटवरच थांबून होते.

दरम्यान आमदार नारायण कुचे यांनी मुख्य प्रवेशद्वारावर थांबलेल्या कार्यकर्त्यांना आत येऊ द्या असे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आत प्रवेश करीत असतानाच पोलिसांनी राज देशमुख यांना हटकवून त्यांना थांबवण्यास सांगितले. त्यानंतर पोलिस आणि त्यांच्यात हुज्जत सुरू झाली. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र १० ते १५ पोलिसांनी थेट लाठीमार केल्याचा आरोप जाधव यांनी केला.

यात जयमंगल जाधव,राज देशमुख व बदनापूरचे तालुकाध्यक्ष सुभाष बोडखे हे तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. लाठीमारानंतर ते स्वत: उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांच्या या लाठीमाराचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.

लाठीमाराचा निषेध करत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचे कळताच अन्य कार्यकर्तेही येथे मोठ्या संख्येने गोळा झाले. त्यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध करून या प्रकाराची चौकशी केली. दरम्यान माजी आमदार चंद्रकांत दानवे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, केशव जंजाळ, विश्वंभर भुतेकर आदींनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली.


लोकांचे म्हणणे ऐकून घ्या
मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींचे म्हणणे एेकून घेतले पाहिजे. मात्र तसे न करता ते गुपचूप बैठक आटोपण्याचा प्रयत्न आहे. आम्ही लोकशाही मार्गाने निवेदन देण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी लाठीमार केला आहे. त्यामुळे लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यास निलंबित करावे. जिल्ह्यात तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात.
- जयमंगल जाधव, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस.

X
COMMENT