आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल घोटाळ्याची चौकशी करावी; अशोक चव्हाणांची मागणी, 27 सप्टेंबरला काँग्रेसचा मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लढाऊ राफेल विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेत आणि संसदेबाहेर राफेल विमान सौद्याप्रकरणी वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली असून पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या घोटाळ्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केली. या घोटाळ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने 27 सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे.  

 
चव्हाण म्हणाले, मोदींना देशहितापेक्षा उद्योगपती मित्रांचा फायदा महत्त्वाचा आहे. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच देश चालवत आहेत हे पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरून सिद्ध झाले आहे. देशाच्या सैनिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल सौदा बदलला हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेस सरकारने एका राफेल विमानाची किंमत 526 कोटी निश्चित केली होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींना सोबत घेऊन फ्रान्सला गेले व जुनी डील रद्द करून प्रति राफेल विमान 1 हजार 1670 कोटी किंमत ठरवून राफेल खरेदीचा करार केला. या नव्या डीलमध्ये 41 हजार 205 कोटी रुपये जास्त मोजले. या बदल्यात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला 30 हजार कोटींचे कंत्राट व 1 लाख कोटींचे लाइफ सायकल कंत्राट दिल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...