Home | Maharashtra | Mumbai | Congress State President Ashok Chavan Comment on CM Devendra Fadanvis

सदृश परिस्थिती नको, दुष्काळच जाहीर करा; दुष्काळ जाहीर करण्यात सरकारची चालढकल, अशोक चव्हाणांची टीका

विशेष प्रतिनिधी | Update - Oct 23, 2018, 07:01 PM IST

सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्यात चालढकल करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण आहे.

  • Congress State President Ashok Chavan Comment on CM Devendra Fadanvis
    मुंबई- यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाची पिके वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही झाली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, असे सांगून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला. तसेच दुष्काळसदृश नको, तर दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


    गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यभरात शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. पण सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्यात चालढकल करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण आहे. सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. तत्काळ चारा छावण्या व टँकर सुरू करावेत.

    जलयुक्त शिवार योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही राज्यात भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे, हे आता सिद्ध झाले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.

    भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, विद्यार्थी, तरुण सरकारवर नाराज आहेत. मराठा, मुस्लिम, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. संपूर्ण महाराष्ट्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे, असे ते म्हणाले.

    आजपासून जनसंघर्ष यात्रा मराठवाड्यात
    24 ऑक्टोबर - तुळजापूर येथून प्रारंभ, औसा, निलंगा, लातूर.
    25 ऑक्टोबर- उदगीर, मुखेड, देगलूर.
    26 ऑक्टोबर- नायगाव, भोकर, नांदेड.
    27 ऑक्टोबर- अर्धापूर, तामसा, हदगाव, कळमनुरी, वसमत.
    29 ऑक्टोबर- परभणी, पाथरी, मंठा.
    30 ऑक्टोबर- जालना, फुलंब्री, सिल्लोड.
    31 ऑक्टोबर- फर्दापूर, कन्नड, गंगापूर.
    1 नोव्हेंबर- अंबाजोगाई, औरंगाबद येथे जाहीर सभेने मराठवाड्यातील जनसंघर्ष यात्रेचा समारोप होईल.

Trending