आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मोस हेरगिरी कांड: निशांतच्या लॅपटॉपमध्ये होत्या ब्रह्मोसच्या \'रेड मार्क फाइल\', 2 पाकिस्तानी महिलांच्या FB खात्यावर शेअर केली माहिती?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित संवेदनशील तांत्रिक माहिती पाकिस्तान व अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना उपलब्ध केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेला 'ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड'च्या नागपूर युनिटमधील सीनियर सिस्टिम इंजिनिअर निशांत अग्रवालला न्यायालयाने तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश एटीएस त्याला घेऊन लखनऊला रवाना झाले आहे. 


दरम्यान, त्याच्या चौकशीतून सध्या अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्याच्या खासगी लॅपटॉपमध्ये एटीएसला ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित काही 'रेड मार्क फायली' आढळून आल्या आहेत. या फायली अत्यंत महत्वपूर्ण तसेच गोपनीय मानल्या जात आहेत. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी त्याचा ट्रान्झिट रिमांड मिळवण्यासाठी न्यायालयात उभे केले. यासाठी एटीएसने न्यायालयात दावा केला की, निशांतच्या खासगी लॅपटॉपमधील फाइल त्याने पाकिस्तानी आयएसआयला शेअर केल्याचा संशय आहे. निशांत हा फेसबुकवर पूजा रंजन आणि नेहा शर्मा या दोन महिलांशी संपर्कात होता. प्रत्यक्षात दोन्ही खाती बनावट असून ती महिलांचे नाहीत. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथून ऑपरेट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे निशांतने खात्यांवर माहिती शेअर केल्याचा संशय असून चौकशीसाठी त्याला उत्तर प्रदेशात न्यावे लागणार आहे. त्यामुळे त्याचा तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड आवश्यक आहे. न्यायालयाने तीन दिवसांचा रिमांड मंजूर केल्यावर त्याला घेऊन उत्तर प्रदेश एटीएस दिल्लीमार्गे लखनऊला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. 


महत्वपूर्ण विभागाचा प्रमुख
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एटीएस व मिलिटरी इंटेलिजन्स विंगच्या संयुक्त पथकाने सोमवारी पहाटे उज्ज्वलनगरातील मनोहर काळे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या निशांतला अटक केली. सोमवारी दिवसभर त्याची अज्ञातस्थळी चौकशी करण्यात आली. उत्तराखंडमधील रुरकीचा रहिवासी २७ वर्षीय निशांत एनआयटी कुरुक्षेत्रमधून उत्तीर्ण झालेला आहे. भारतीय संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) व रशियाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडमध्ये २०१३ पासून सिस्टिम इंजिनिअर पदावर रूजू झाला. काही दिवस हैदराबादेत काम केल्यानंतर तो नागपूर युनिटमध्ये आला. नागपुरात वर्धा मार्गावर डोंगरगाव येथील ब्रह्मोस एरोस्पेसच्या युनिटमध्ये तो उत्पादन विभागातील महत्त्वाच्या 'हायड्रालिक्स न्यूमॅटिक्स अॅन्ड वॉरहेड इंटिग्रेशन' या विभागाचा प्रमुख होता. 


घरमालक अद्यापही जबर धक्क्यात 
सोमवारी पहाटे ५ वाजता पथक मनोहर काळेंच्या घरी पोहोचले. पथकातील अधिकाऱ्यांनी भिंतीवरून उड्या मारून आत येऊन निशांतच्या घराचा दरवाजा ठोठावला. घराची झडती घेतल्यावर त्याला घेऊन पथक अज्ञातस्थळी रवाना झाले. माध्यमांनी घरमालक मनोहर काळेंशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण कारवाईमुळे त्यांनाही जबर धक्का बसल्याचे जाणवत होते. 


असा लागला सुगावा 
उत्तर प्रदेश पोलिसांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, निशांत अग्रवाल हा गेल्या महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला होता. गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेश एटीएसने पाकिस्तानच्या आयएसआयचा एजंट म्हणून काम करीत असलेल्या बीएसएफ जवानाला अटक केल्यावर त्याच्या चौकशीतून एक संपूर्ण साखळीच पुढे आली. त्यात निशांतचाही समावेश होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी फेसबुकसह निशांतच्या सोशल मीडियावरील चॅटिंगच्या नोंदणी तपासण्याचे काम हाती घेतले होते. 

 

मार्चमध्येच झाले होते लग्न

नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले की, या संयुक्त कारवाईत नागपूर पोलिसांची फारशी भूमिका नव्हती. या पथकांनी मागितलेली जुजबी मदत तेवढी त्यांना पुरविण्यात आली आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने कारवाईचे डिटेल्सही या पथकांनी शेअर केलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. निशांत हा नागपुरातील उज्वलनगर भागातील मनोहर काळे यांच्या घरी किरायाने रहातो. मार्चमध्येच त्याचे लग्न झाले होते. घर परिसरातही एटीएसच्या पथकांकडून तपासणीचे काम बराच वेळ सुरू होते.

 

युवा वैज्ञानिक पुरस्काराने गौरव
निशांत हा उत्तराखंडमधील रुरकी येथील रहिवासी आहे. तो कुरुक्षेत्रच्या एनआयटीचा पासआऊट आहे. तो ब्रह्मोस मिसाइल युनिटमध्ये चार वर्षांपासून काम करत होता. हायड्रॉलिक-न्यूमेटिक्स आणि वॉरहेड इंटिग्रेशन विभागाच्या ४० लोकांच्या चमूचे नेतृत्व करत हाेता. २०१७-१८ मध्ये युनिटने त्याचा युवा वैज्ञानिकाच्या पुरस्कारानेही गौरव केला होता. ब्रह्मोसच्या सीएसआर, आरअँडडी ग्रुपचाही सदस्य आहे. सध्या ब्रह्मोस नागपूर व पिलानी साइट्सचे प्रोजेक्ट्स पाहत होता.

 

पाक एजंटच्या चौकशीतून सुगावा
यूपी एटीएसने काही महिन्यांपूर्वी आयएसआय एजंटाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून निशांत अग्रवालचे नाव समोर आले. मिलिटरी इंटेलिजन्सला याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर यूपी एटीएस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकांनी त्याची माहिती जमवणे सुरू केले होते.


असे आहे ब्रह्मोस :

सुपरसॉनिक ब्रह्मोस हे उच्च मारक क्षमतेचे क्षेपणास्त्र आहे. चीनसारख्या प्रगत देशांकडेही असे तंत्रज्ञान नाही, असे मानले जाते. ब्रह्मोस हा भारताच्या डीआरडीओ व रशियाच्या एनपीओएमचा संयुक्त उपक्रम आहे. गतवर्षी निशांतच्याच युनिटने मिसाइल सिस्टिमच्या अत्याधुनिक आवृत्त्यांची चाचणी केली होती. नागपुरात वर्धा मार्गावर ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडचे युनिट आहे.

 

काय आहे हनी ट्रॅप :

आयएसआयने संवेदनशील माहितीसाठी आजवर अनेकदा हनी ट्रॅपचा वापर केल्याचे आढळून आले आहे. सुंदर तरुणींचे बनावट सोशल मीडिया अकाउंट उघडून त्यावर फ्रेंडशिप करायची. चॅटिंगद्वारे महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढायचे आणि माहिती काढून घ्यायची, अशी आयएसआयची रणनीती राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...