आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबईबाहेर जाताना कुणाच्याही परवानगीची गरज असणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळांना ही परवानगी दिली असून या निर्णयामुळे भुजबळांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. मात्र, राज्याबाहेर जायचे असल्यास तपास अधिकाऱ्याला त्याबाबतची संपूर्ण माहिती देणे त्यांना बंधनकारक असणार आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ३ महिन्यांपूर्वी जामीन देताना न्यायालयाने भुजबळांवर विशेष पीएमएलए न्यायालयाच्या हद्दीबाहेर म्हणजेच मुंबईबाहेर जाण्यावर निर्बंध लादले होते. मात्र, मुंबईबाहेर जायचे असल्यास विशेष पीएमएलए न्यायालयाची तसेच अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याची अट होती. त्यातून सूट मिळावी यासाठी भुजबळांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्या. प्रकाश नाईक यांनी भुजबळांची विनंती मान्य करत त्यांना मुंबईबाहेर जाण्यापूर्वी कुणाच्याही परवानगीची घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, राज्याबाहेर जायचे असल्यास भुजबळांना ते जाणार असलेले नियोजित ठिकाण, वास्तव्याचा कालावधी आणि पत्ता तपास अधिकाऱ्याला कळवावा लागणार आहे.
राजकीयदृष्ट्याही होणार सोय
जामिनावर मुक्त झाल्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाला हजेरी लावत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक शहरांचा दौराही केला होता. एवढेच नव्हे तर नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहत सरकारवर तोफ डागली होती. या पार्श्वभूमीवर आगामी वर्ष निवडणुकांचे असणार आहे. भुजबळांना मिळालेली ही सवलत त्यांना राजकीयदृष्ट्या सोयीची ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.