आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयाच्या आवारातच श्वानांनी तोडले मृत अर्भकाचे लचके; नाशकातील धक्कादायक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात श्वानांनी मृत अर्भकाचे लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार (दि.२९) सकाळी उघडकीस आला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मृत अर्भक श्वानांच्या तावडीतून सोडवण्यात आले. विशेष म्हणजे या अर्भकाच्या पायाला बिल्ला असल्याने आईची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयाच्या आवारात झेंड्याच्या जवळ भींतीलगत श्वान काही तरी खात असल्याचे सहायक उपनिरिक्षक शिवाजी भालेराव यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता अर्भकाचा उजवा भाग श्वानांनी लचके तोडून खाल्ल्याचे निदर्शनास आले. श्वानांच्या तावडीतून त्यांनी मृत अर्भक सोडवले. अर्भकाच्या पायाला मृत झाल्यानंतर लावण्यात आलेला बिल्ला सुदैवाने तसाच होता. त्यावर बबाबाई बरडे (रा. इगतपुरी)  या महिलेचे नाव मिळाले. प्रसूती कक्षामध्ये चौकशी केली असता ही महिला प्रसुतीकरीता मंगळवार (दि.25) दाखल झाली होती. तिची सिझेरियन शस्त्रक्रिया करुन प्रसूती करण्यात आली. दुर्दैवाने अर्भक मृत झाले. महिलेची प्रकृती खालावल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली असता मृत अर्भक बुधवारी (दि.26) आजोबाच्या ताब्यात दिले होते. त्यांनी हे अर्भक दफन करण्यासाठी नात आणि मुलीकडे दिले होते. मात्र, दोघींनी अर्भकाला दफन न करता  जिल्हा रुग्णालयाच्या मागे झाडात फेकून दिले. मोकाट श्वानांनी मृत अर्भक ओढून नेले. त्यानंतर श्वान  लचके तोडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी ताडीने  मृत अर्भकाची श्वानांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांनी कडक भाषेत नातेवाईकांना समज देत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. याप्रकरणी  सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

 

बिल्ल्यामुळे ओळख
मृत अर्भक आढळल्यानंतर ओळख पटवणे पोलिसांना अवघडा झाले असते. मात्र, या अर्भकाच्या पायाला एसएनसीयू विभागाचा बिल्ला असल्याने  त्याच्या आईची ओळख पटवणे शक्य झाले. विभागाने मृत अर्भक नातेवाईकांच्या ताब्यात देताना बिल्ला काढून आपल्या रेकॉर्डला ठेवणे अपेक्षित असते.  मात्र, केवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अर्भकावर अंत्यसंस्कार होणे शक्य झाले. संबधित  एसएनसीयू विभागाचा बिल्ला नसता तर ओळख पटवणे अवघड झाले असते.

 

पैसे नसल्याने अर्भक फेकले
नातेवाईकांच्या ताब्यात मृत अर्भक दिले होते. त्यांना अमरधाम स्मशानभूमीपर्यंत  जाण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी अर्भक रुग्णालयाच्या बाहेर भींतीलत टाकून दिले. सुदैवाने यावर बिल्ला होता. त्या अधारे ओळख पटवणे शक्य झाले.  उपसंचालकांनी भेट दिली. वरिष्ठांना कळवण्यात आले आहे.
- डॉ.सुरेश जगदाळे जिल्हा शल्यचिकित्सक

बातम्या आणखी आहेत...