आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांची लोक बिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदत, प्रकाश आमटेंची फेसबुक पोस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोनी टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती'च्या 10 व्या सीझनमधील 'केबीसी-कर्मवीर' या स्पेशल एपिसोडमध्ये ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी 25 लाख रुपये जिंकले. या एपिसोडनंतर कार्यक्रमाचे यजमान आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी लोक बिरादरी प्रकल्पाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याची माहिती खुद्द डॉ. प्रकाश आमटे यांनी 'फेसबुक'च्या माध्यमातून दिली आहे.

 

प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे पहिल्यांदाच केबीसीच्या हॉटसीटवर बसले होते. 7 सप्टेंबर रोजी हा भाग प्रसारित झाला होता.

 

वाचा... डॉ. प्रकाश आमटेंची 'फेसबुक' पोस्ट जशीच्या तशी

 

'महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकल्पाला आर्थिक मदत'
'महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोनी टीव्ही वरील कौन बनेगा करोडपती या गेम शो मध्ये खेळून डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी काल 25 लाख रुपये जिंकले.

महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतःची रुपये 25 लाखांची देणगी लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी दिली आहे. कार्यक्रम झाल्यावर त्यांनी 25 लाख रुपयांची देणगी प्रकल्पासाठी देत असल्याचे सांगितले आणि स्वतःचे 25 लाख रुपये महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पाच्या खात्यात जमा केले आहेत. स्वतःच्या देणगीचा त्यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला नाही हे फार विशेष आहे. त्या बद्दल आम्ही प्रकल्पातर्फे त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमामुळे लोक बिरादरी प्रकल्पाचे काम अजून दूरवर जाऊन पोहोचले आहे. महाराष्ट्रा बाहेरच्या राज्यातील जनतेपर्यंत हे कार्य पोहोचले आहे. गडचिरोली जिल्ह्यात यापुढे संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल अशी अपेक्षा आहे. लोक बिरादरी प्रकल्पावर नितांत प्रेम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक व तसेच सर्व भारतातील जनतेचे आम्ही ऋणी आहोत. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने आमचा काम करण्याचा उत्साह द्विगुणित होत असतो. या दुर्गम भागात सुसज्य दवाखान्यात चांगली आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, बांबू हस्तकला, पाण्यासाठी गावागावात मोठे तलाव व गाव विकास अशा कार्यातून या भागातील आदिवासी बांधवांचा विकास साधण्याचा आम्ही ध्येयाने प्रेरित असलेल्या कार्यकर्त्यांच्या साथीने निरंतर प्रयत्न करीत आहोत आणि करीत राहणार. गेल्या 45 वर्षात प्रकल्प निर्मितीत हजारो लोकांनी आर्थिक सहभाग दिला आहे. त्याशिवाय एवढे काम उभे करणे अवघड झाले असते. सर्व दात्यांचे आभार. लोक बिरादरी प्रकल्पातील सर्व कार्यकर्त्यांचे योगदान भरीव आहेच. आणि हे कार्य म्हणजे एक टीम वर्क आहे. कार्यकर्ते, देणगीदार, शुभचिंतक, पत्रकार बांधव, आदिवासी बांधव यांच्या मिश्रणाने हा प्रकल्प उभा राहिला आहे. सर्वांचेच आभार. लोभ असावा असाच.'

 

 

बातम्या आणखी आहेत...