आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमप्रकरणातून मुलगी गरोदर; बदनामी होण्याच्या भीतीने वडिलांनी केला खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन - एका पायाने अपंग  मुलीला वडिलाने पुणे येथील एका अपंग विद्यालयात शिक्षणासाठी ठेवले. परंतु, तेथे एका मुलासोबत तिचे प्रेमप्रकरण होऊन ती पाच महिन्यांची गरोदर राहिली. दरम्यान, ही मुलगी दिवाळीच्या सुटीत गावी आली असता, हा प्रकार समोर आला. समाजात बदनामी होईल या  भीतीने त्या मुलीला जळगाव जिल्ह्यातील आसोदा गावातून मराठवाड्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील जंगलात आणून तिचा गळा आवळून खून करण्यात आला.

 

यानंतर मृतदेह झाडाला लटकवून  आत्महत्येचा बनाव केला.  मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा काही तासातच उलगडा करीत मुलीच्या वडिलासह नात्यातीलच चार जणांना गजाआड केले. त्यांनी खुनाची कबुली दिली. छाया समाधान डुकरे (२०, जांब, जि. बुलडाणा) असे मृत मुलीचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा ते फत्तेपूर रोडवर जंगलात सोमवारी मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाय, पारध ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता घातपाताचा संशय आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून चार तासांतच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

 

 मुलीचे वडील समाधान डुकरे (४५) याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याच्या जबाबात तफावत वाटत होती.  पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, प्रेम प्रकरणातून मुलीला गर्भधारणा झाली होती.  यामुळे समाजात बदनामी होईल या भीतीने तिला मारल्याची कबुली त्याने दिली. समाधान डुकरेसह त्याचे रुईखेडा येथील साडू महादू उगले (४०), सोनगिरी येथील अण्णा लोखंडे (४०),  आसोदा येथील मुलीच्या आत्याचा मुलगा रामधन दळवी (२०) या चौघांनी दोरीने तिचा गळा आवळून खून करून  मृतदेह धावडा शिवारातील जंगलात आणून टाकल्याची कबुली दिली.  

 

पथक पुण्याकडे रवाना
मृत छाया समाधान डुकरे ही  पुणे येथे शिक्षण घेत असताना एका खासगी कंपनीत पार्ट टाइम काम करीत होती. दरम्यान, याच कंपनीत काम करणारा भुसावळ येथील शुभम वऱ्हाडे याच्याशी तिचे सूत जुळले होते. या प्रकरणातून ती पाच महिन्यांची  गरोदर  होती. शुभम यालाही ताब्यात घेण्यासाठी पारध येथील एक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

 

अधिक तपास सुरू  
या खुनाबाबत आरोपींनी कबुली दिली आहे. दरम्यान, प्रेम प्रकरणातील पुणे येथील त्या मुलालाही ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक पथक रवाना झाले आहे.  
-सुदाम भागवत, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पारध.  

 

 ७७ कि.मी. प्रवास
आसोदा येथून मुलीला वडील समाधानसह नातेवाइक रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गावाकडे निघाले होते.  एका दुचाकीवर दोघ  तर दुसऱ्या दुचाकीवर मुलीसह दोन जण  होते. आसोदा ते जांब असा ७८ कि.मी. प्रवास करत रात्री ११.३० च्या सुमारास धावडा परिसरात  त्यांनी मुलीचा खून केला.

 

२१ ते २५ नोव्हेंबरदरम्याचा घटनाक्रम  
२१ नोव्हेंबर : दिवाळीच्या सुट्यांमुळे पुणे येथून ही मुलगी गावाकडे आली होती. या दिवशी तिला खान्देशातील जळगाव येथील एका नातेवाइकांकडे नेऊन या प्रेमप्रकरणाबाबत विचारपूस केली.  
-२२ ते २४ नोव्हेंबर :  मुलगी, शिकत असलेल्या शाळेतून बरीचशी माहिती नातेवाइकांनी घेतली. यानंतर मुलीशी चर्चा केली असता ती गरोदर राहिल्याची माहिती समोर आली.  
-२५ नोव्हेंबर : जळगाव येथून परत जांब गावाकडे दुचाकीहून आणले जात असताना वडिलासह चार नातेवाइकांनी तिचा गळा आवळून खून करत मृतदेह धावडा जंगलात  झाडाला लटकवला.  
-२६ नोव्हेंबर :  सकाळी ११ वाजेच्या सुमारास जनावरे चारणाऱ्या एका गुराख्याला मृतदेह दिसल्याने पोलिसांना माहिती दिली. यानंतर दीड तासांतच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन तपास केला. चार तासांतच खुनाचे बिंग फुटले.

 

 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पहा..  संबंधित फोटो 

 

बातम्या आणखी आहेत...