आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या 3 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून आई व पुतणीला केली बेदम मारहाण, अकोल्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचा गोपालचा इरादा होता.

अकोला- संपत्तीच्या वादातून एका व्यक्तीने पोटच्या तीन वर्षांच्या मुलीचा गळा आवळून तिचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. नंतर आरोपीने जन्मदात्या आई आणि पुतणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आई आणि पुतणी गंभीर जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ही घटना पातूर येथे मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास  घडली.

 

गोपाल शंकर बेलूरकर (30, रा खानापूर, ह.मु.गहिलोत नगर, पातूर) असे आरोपीचे नाव आहे पातुरचे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. खानापूर येथे बेलुरकर कुटुंबीयांकडे 18 एकर शेती आहे. गोपालचा मोठा भाऊ खानापूर येथे शेती करतो. त्याची मोठी मुलगी गायत्री हे गोपालकडे पातूर येथे शिक्षणासाठी आहे. आई मोठ्या भावाकडे जास्त लक्ष देते, आपल्याकडे तिचे दुर्लक्ष असल्याने संपत्तीमध्ये आपल्यासोबत दुजाभाव होईल, अशी शंका आरोपी गोपालचे मनात होती. त्याचा राग मनात ठेवून संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचा गोपालचा इरादा होता.

 

दिवाळीमध्ये गोपालची पत्नी माहेरी आंबेटाकळी तालुका खामगाव (जि बुलढाणा) येथे गेली. ती अद्याप परत आली नव्हती. मंगळवारी सकाळी गोपाल याने तीन वाजताच्या सुमारास सुरुवातीला झोपलेल्या तीन वर्षीय मुलगी मयुरीचा गळा आवळून खून केला. नंतर घराच्या पाठीमागे साप निघाला, असे म्हणून आईला घरामागे घेऊन गेला. तेथे तिचे हातपाय बांधण्याचा प्रयत्न केला; मात्र आईने आरडाओरड केल्याने पुतणी गायत्री झोपेतून उठून जागी झाली व काकाला आवरण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या डोक्यात सुद्धा लोखंडी सळीने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. एकच आक्रोश झाल्याने शेजारी जागे झाले त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी आरोपी गोपाल याला अटक केली.

 

नंतर भावालाही करणार होता ठार
मुलगी, आई, पुतणी यांना ठार करून खानापूर येथे जाऊन भावाला सुद्धा जीवे ठार मारण्याचा आरोपी गोपाल याचा इरादा होता. मात्र वेळीच आरोपीला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...