आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळोद्यात सरदार सरोवराच्या पाण्यात डुंगी उलटली..12 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू तर एक थोडक्यात बचावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा- किराणा घेण्यासाठी गेलेल्या दोन मुलींची डुंगी अर्थात छोटी होडी सरदार सरोवराच्या पाण्यात उलटली. यात बारा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला तर एक मुलगी थोडक्यात बचावली. सपना वादऱ्या पावरा असे मृत मुलीचे नाव असून ती सावऱ्या दिगर येथील राहाणारी होती.

 

सावर्‍या द‍िगर या गावाला रस्ता नसल्याने साधा किराणा घेण्यासाठी या भागातील लोकांना डुंगीचा वापर करावा लागतो. अशातच डुंगी उलटून झालेल्या अपघातात सपनाचा बुडून मृत्यू झाला. अन्य एका मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात गावकर्‍यांना यश मिळाले आहे. तिचे नाव मोगी वकल्या पावरा असे आहे. 


सावऱ्या दिगर हे सरदार सरोवर धरणाच्या पाण्यामुळे टापू होत असलेले गाव आहे. 2004-95 मध्ये टापू क्षेत्रासाठी भिंगारे समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 2005 साली  अहवाल दिला होता.त्यात  सावऱ्या दिगर या गावासाठी रस्ता बनवून दिल्यास पुनर्वसनाची गरज पडणार नाही. म्हणून करोडो रुपयांचा रस्ता सावऱ्या दिगर या गावासाठी मंजूर झाला, नर्मदा आंदोलनाने वेळोवेळी मागणी करूनही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. गेल्या वर्षी भूषा येथे नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे डॉ. अफरोज अहमद आलेले असताना नर्मदा आंदोलनाने त्यांचेकडे या पुलाची तक्रार केली. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला मार्च 18 पर्यंत काम पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले.. परंतु रस्त्याचे काम आजही बंद आहे. किमान रस्ता पूर्ण होईपर्यंत लोकांना दळणवळणासाठी मोफत बोट उपलब्ध करून द्यावी,असेही प्रशासनाने म्हटले होते. परंतु तरीही त्यांनतर नर्मदा विकास विभागाने बोट पुरविली नाही, पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यावर 3 महिन्यापूर्वी नर्मदा विकास विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बोट उपलब्ध करुन दिली. परंतु तीही अनियमित असते. गावकर्‍यांनी अनेक वेळा बोट मालकाला विचारले असता डिझेल नियमित पुरवत नसल्यामुळे नियमित येऊ शकत नाही असे सांगितले. आज पुन्हा एकदा विकासाच्या व पुनर्वसनाच्या नावावर होणाऱ्या रस्त्यासाठी एक नाहक बळी जावा लागला जे अतिशय गंभीर व खेदजनक आहे.

बातम्या आणखी आहेत...