Home | National | Gujarat | Godhra Train Carnage Two get Life Imprisonment 3 Acquitted

गोध्रा रेल्वे जळीत हत्याकांडातील दोघांना जन्मठेप, तिघांची मुक्तता, 59 कारसेवकांना जाळले होते जिवंत

वृत्तसंस्था | Update - Aug 27, 2018, 05:37 PM IST

गुजरातमधील गोध्रा येथे 27 फेब्रुवारी 2002 मध्ये झालेल्या रेल्वे जळीत हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना विशेष न्यायालयाने

 • Godhra Train Carnage Two get Life Imprisonment 3 Acquitted

  अहमदाबाद- गुजरातमधील गोध्रा येथे 27 फेब्रुवारी 2002 मध्ये झालेल्या रेल्वे जळीत हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना विशेष न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर तीन जणांची निर्दोष मुक्तता केली. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लावून 59 कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले होते.

  साबरमती एक्स्प्रेसचे 2 डबे जाळण्याच्या कटात सहभाग सिद्ध झाल्यानंतर विशेष तपास पथकाचे (एसआयटी) विशेष न्यायाधीश एच. सी. व्होरा यांनी फारूक भाना आणि इम्रान शेरू या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हुसेन सुलेमान मोहन, कसम भामेडी आणि फारूक धांटिया या तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या पाचही जणांना 2015-16 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी येथील साबरमती केंद्रीय कारागृहात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात झाली.

  मोहनला मध्य प्रदेशमधील झाबुआ येथून, भामेडीला गुजरातच्या दाहोद रेल्वे स्थानकावरून, धांटिया आणि भाना यांना गोध्रा येथील त्यांच्या घरांतून अटक करण्यात आली होती, तर भटुक याला महाराष्ट्रातील मालेगाव येथून अटक झाली होती. या हत्याकांडातील आठ आरोपी अजूनही फरारच आहेत.

  तत्पूर्वी विशेष एसआयटी न्यायालयाने या प्रकरणात 1 मार्च 2011 रोजी 31 जणांना दोषी ठरवले होते. त्यानंतर न्यायालयाने ११ जणांना फाशीची तर इतर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र, गुजरात उच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2017 मध्ये 11 जणांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले होते, तर एसआयटी न्यायालयाने 20 जणांना दिलेली शिक्षा कायम ठेवली होती.

  असे आहे प्रकरण
  27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा रेल्वेस्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लावून 59 कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले होते. त्यानंतर गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठी जातीय दंगल उसळली होती. तीत 1000 लोक ठार झाले होते. त्यात बहुतांश अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांचा समावेश होता.

Trending