आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाय नाही म्हणून काय झाले, दोन हातांनी मंठ्याचा महेश करतोय 100 गायींचा सांभाळ, 9 जणांनाही दिला रोजगार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बसचा अपघात झाल्याने कमरेखाली अपंगत्व आले

मंठा- लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच भद्रा मारोतीहून परतताना बसचा अपघात झाल्याने कमरेखाली अपंगत्व आले. यात कमरेखालील खालचा भाग पूर्णच बधिर झाला. डॉक्टरांनी तर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ जगणे अवघड असल्याचे सांगितले, परंतु प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर महेश भास्कर सराफ (35, मंठा) याने न डगमगता अपघातातून मिळालेल्या पैशातून गोशाळेसाठी गोठा उभारून 96 गायींचा सांभाळ केला. एक दुकानही उभे करून नऊ जणांना रोजगार मिळवून देणारा महेश हा अपंगांसाठी एक प्रेरणा देणारा व्यक्ती ठरत आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारोतीचे दर्शन घेऊन परतत असताना जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात झालेल्या अपघातात महेश सराफ याचे कमरेखालील शरीर पूर्णपणे निकामी झाले होते. या अपघातानंतर महेश दोन वर्षे अंथरुणावरच पडून होता. त्याला साधे उठून बसताही येत नव्हते. धार्मिक वृत्ती अंगी असल्याने तो बसल्या जागी विविध भक्तिगीते, प्रवचन, कीर्तन ऐकायचा. यातूनच त्याला गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या भागवत कथा, प्रवचने ऐकायचा छंद जडला. आपणही जमेल तेवढी गोसेवा करावी, असा विचार त्याच्या मनात आला. त्याने पत्नी, वडील आणि जवळच्या मित्रांना हा विचार बोलून दाखवला. सगळ्यांनी त्याला होकार दिल्यानंतर महेशने आपला मित्र संतोष तिवारीला सोबत घेऊन येथील लक्ष्मीनारायण मंदिरात दोन गायी घेऊन गोशाळा सुरू केली. आज या गोशाळेत लहान-मोठ्या शंभर गायी आहेत. बस अपघात झाल्यामुळे महेशला अनुकंपा राशी मिळाली. परंतु यातील दोन लाख रुपये खर्च करून त्याने गोशाळेसाठी पत्राचे मोठे शेड बांधून घेतले. गायींची देखभाल, चारा-पाणी आणि दूध काढण्यासाठी तीन जणांना कामावर घेतले. त्यांची मजुरी तसेच चारा-पाणी यासाठी दरमहा चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च होतो. महेशला या कामात त्याचे मित्रही मदत करत आहेत. यामुळे दिवसेंदिवस आता या गोशाळेत गायींची संख्या वाढू लागली आहे.

 

इच्छाशक्ती 2007 मध्ये मंठा येथील महेशला अपघाताने व्हीलचेअरवर बसवले; तरीही न डगमगता दोन गायी घेऊन लक्ष्मीनारायण मंदिरात सुरू केली.

 

विविध दुकानांवर दानपेट्या : मंठा शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या काउंटरवर गोसेवा दानपेट्या ठेवल्या असून यातून मिळणाऱ्या पैशावर गोशाळा चालवण्यासाठी आर्थिक मदत होते. काही राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आपल्या वाढदिवसानिमित्त गोशाळेसाठी एक दिवसाचा चारा देतात.

 

गायरान जमीन मिळावी
सेवाभावाने चालणाऱ्या या गोशाळेसाठी शासकीय गायरान जमीन मिळावी, यासाठी महेश आणि संतोष तिवारी यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. गोशाळेचे सर्व व्यवस्थापन महेश व्हिलचेअरवर बसून करतो. जमाखर्चाचा हिशेब पारदर्शकपणे दरमहा बैठकीत व सोशल मीडियावर टाकला जातो. गो शाळेचे व्यवस्थापन पाहणारा महेश दिवसभर स्वतःचे कटलरी दुकान चालवतो. दुकानातही त्याने पाच तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला , तर स्वत:च्या दोन मेहुण्यांना व्यवसायात उभे केले आहे.

 

प्रत्येक बाबतीत दक्ष
महेश सकाळी साडेपाच वाजता उठल्यानंतर प्राणायाम आणि शक्य होतील तेवढी आसने करतो. धार्मिक पुस्तकांचे नित्य पठण करूनच दुकानात येतो. दुकानातील खरेदी आणि विक्रीचे बसल्याजागी मोबाइलवर नियोजन करतो. मोबाइलचा उत्तम वापर करून गोशाळा आणि दुकानातील कामाचे त्याचे नियोजन खूपच स्तुत्य असते. महेशने चार लोकांना गोशाळेत तर पाच जणांना दुकानात रोजगार दिला.
- संतोष तिवारी, महेशचा सहकारी मित्र

 

कुटुंबाची साथ, गोसेवेचे व्रत सुरूच ठेवणार
अपघातानंतर डॉक्टरांनी सहा महिनेच जगता येईल, असे सांगितले होते. परंतु पत्नी अलकाची खंबीर साथ तसेच सर्व कुटुंबीय आणि मित्र परिवार यांनी जगण्याची उमेद दिली. हाती घेतलेले गो सेवेचे व्रत यापुढेही आणखी सुरूच ठेवणार आहे. यासाठी दानशूर लोकांच्या मदतीची गरज आहे. दुष्काळी स्थितीत चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने मदतीची गरज आहे.
-महेश सराफ, गोशाळा चालक

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...