कन्हैयाकुमार यांची रविवारी / कन्हैयाकुमार यांची रविवारी औरंगाबादेत जाहीर सभा; आमदार सतीश चव्हाण यांचा पुढाकार

  • संविधानविरोधी शक्तींना खतपाणी घातले जात आहे

Dec 06,2018 08:19:00 PM IST

औरंगाबाद- ‘संविधान बचाव- देश बचाव!’ या मोहिमेअंतर्गत जेएनयूतील विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष व एआयएसएफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कन्हैयाकुमार यांची आमखास मैदान, औरंगाबाद येथे रविवार, 9 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक आमदार सतीश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सत्तेच्या माध्यमातून संविधानविरोधी शक्तींना खतपाणी घातले जात आहे. झुंडशाही करणाऱ्या टोळ्या उन्माद फैलावत असताना सरकार मूक आहे. याच लोकांची अगदी हे संविधान आमचे नाही म्हणून संविधानाची प्रत जाळण्यापर्यंत मजल गेली आहे. तरी त्यावर सरकार प्रतिक्रिया देत नाही. उलट धर्म, जात, वर्ण, पंथ यांच्या नावाखाली प्रतिमा, प्रतीकांचे राजकारण पुन्हा गतिमान झाले असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी जोरात सुरू आहे. जन की बात नव्हे, तर मन की बात करून आम्ही म्हणतो तेच ऐकावे लागेल, अशा प्रवृत्तीचा जोर वाढला आहे. म्हणून येत्या काळात समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन हे थांबवावे लागेल, असे आ. सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

आ. सतीश चव्हाण या जाहीर सभेचे संयोजक असून संयोजन समिती म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटी, ए. आय. एस. एफ., बामुक्टो, बामुक्टा, मुप्टा, एस. एफ.आय., एन. एस. यू. आय., ए. आय. वाय. एफ., बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा, गब्बर अॅक्शन कमिटी, शेतकरी कामगार विद्यार्थी संघटना, पुरोगामी शिक्षक शिक्षकेतर संघटना, रिपब्लिकन बहुजन सेना, भारतीय दलित पँथर युवा आघाडी, आझाद युवा ब्रिगेड, मायनॉरिटी यूथ फाउंडेशन, ऑल इंडिया तंजीम-ए-इन्साफ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आदी संघटना ही जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

या पत्रकार परिषदेस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सचिव प्रा. राम बाहेती, जिल्हा सचिव अश्फाक सलामी, अभय टाकसाळ, इलियास किरमाणी, प्रा. सुनील मगरे, डॉ. राजेश करपे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

X