गोविंद पानसरे हत्येप्रकरणी / गोविंद पानसरे हत्येप्रकरणी शार्पशूटर भरत कुरणेसह वासुदेव सूर्यवंशी अडकला एसआयटीच्या जाळ्यात

  • वासुदेव याच्यावर मारेकर्‍यांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप

Dec 01,2018 06:07:00 PM IST

कोल्हापूर- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‍विशेष तपास पथकाने दोन जणांना अटक केली आहे. शनिवारी दोन्ही आरोपींना कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आले. एक आरोपी हा गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित आहे.

भरत कुरणे याला कर्नाटकातील बेळगाव येथून तर वासुदेव सूर्यवंशी याला बंगळुरु येथून अटक करण्यात आली आहे. वासुदेव याच्यावर गौरी लंकेश आणि पानसरे यांची हत्या करण्‍यासाठी मारेकर्‍यांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे.

अशी झाली होती पानसरे यांची हत्या..

कोल्हापूर शहरातील सागर मॉल परिसरात पत्नी उमा यांच्यासह गोविंद पानसरे हे 16 फेब्रुवारी 2015 रोजी माॅर्निंग वॉकला निघाले होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात चौघांनी पानसरे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या होत्या. हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत पानसरे यांना मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. उपचार सुरु असताना 20 फेब्रुवारीला पानसरे यांची प्राणज्योत मालवली होती. उमा पानसरे यांच्या डोक्याला गोळी लागली होती. या हल्ल्यात त्या थोडक्यात बचावल्या.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला 16 सप्टेंबरला अटक केली होती.

X