आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा, वाघ आला..आजोबांनी बिबट्याचा हल्ला लावला परतवून; जबड्यातून सोडवले नातवाचे डोके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनेगाव (जि. नाशिक)- ‘बाबा, वाघ आला..’ अशी आरडाओरड करीत समीर (७) अंगावर पांघरूण ओढू लागला. मात्र, आजोबांनी कुत्रे असेल असे म्हणत त्याला गप्प राहून झोपण्यास सांगितले. एव्हाना बिबट्याने समीरचे डोकेही जबड्यात धरले हाेते आणि त्यास अंथरुणाच्या बाहेर ओढू लागला. या हालचालींमुळे मग आजोबांनीही तोंडावरील पांघरूण बाजूला करून पाहिले असता त्यांना अापल्या नातवाजवळ बिबट्या दिसला. त्यांनी जिवाच्या अाकांताने  आरडाओरड सुरू केली. तापर्यंत बिबट्याने चिमुकल्या समीरला अंथरुणाबाहेरच ओढले होते. मात्र, अाजाेबाचा टाहाे एेकून घरातील मंडळी बाहेर आल्याने बिबट्याने पळ काढला. 


नाशिक जिल्ह्यातील रामनगरच्या आश्रमशाळेजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजताला ही थरारक घटना घडली. समीर व आजोबांना रोज पहाटे  उठण्याची सवय आहे. घटनेच्या वेळी ते जागेच असल्याने या दाेघांचाही जीव वाचला. समीर साहेबराव मंडले (७) याच्या डोक्याला बिबट्याचे दोन दात लागल्याने तो जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


समीर आणि आजोबा पुंजा कारभारी मंडले घरासमोरील ओट्यावर झोपले होते. दोघांनाही रोज पहाटे चारला उठण्याची सवय आहे. शुक्रवारी पहाटे अंथरुणात पडल्यापडल्या त्यांच्या गप्पा सुरू होत्या. आजोबांच्या तोंडावर पांघरूण होते. मात्र, समीरचा चेहरा उघडा होता. बिबट्या आल्याचे पाहिल्यावर त्याने आजोबांना ‘वाघ आला’ असे सांगितले. कुत्रे असेल असा समजून आजोबांनी त्याला गप्प झोपण्यास सांगितले. समीर तोंडावर पांघरूण घेऊन बचावाच्या प्रयत्नात असतानाच बिबट्याने त्याचे डोके जबड्यात पकडले. समीरची आरडाओरड व हालचालीने आजोबा उठून समीरला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. गोंधळामुळे घरातील सर्व जण जागे होऊन मदतीला बाहेर आले. त्यामुळे बिबट्याने समीरला साेडून देत डोंगराच्या दिशेने पळ काढला. 


नरभक्षकाची चर्चा अन् दहशत 
या घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या कचेश्वर मंडले, भिका मंडले, दीपक चव्हाण यांच्या शेतात अाठ दिवसांपूर्वीच दोन शेळ्या, दोन मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. आता लहान मुलांना उचलण्याचा प्रयत्न करू लागल्याने ताे नरभक्षक झाल्याची चर्चा अाणि दहशत परिसरातील वस्त्यांमध्ये पसरली आहे. त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.  

बातम्या आणखी आहेत...